इंडोनेशियामध्ये शनिवारी रात्री साडे नऊच्या सुमारास समुद्रात अनॅक क्रॅकोटा या ज्वालामुखीचा उद्रेक झाल्याने अनेक बेटांना त्सुनामीचा तडाखा बसला. स्थानिक वेळेनुसार रात्री साडेनऊ वाजता झालेल्या या उद्रेकामुळे त्सुनामीच्या मोठ्या लाटा समुद्रात उसळल्या. या त्सुनामीचा सर्वाधिक फटका जावा व सुमात्रा बेटांदरम्यानच्या सुंदा पट्ट्याला बसला. स्फोट झाल्यानंतर अवघ्या काही क्षणांमध्येच समुद्रात उसळलेल्या उंचच उंच लाटांनी किनाऱ्यांवर धडक द्यायला सुरुवात केली. यामध्ये सर्वाधिक फटका हॉटेल आणि किनाऱ्या लगतच्या घरांना बसला आहे. या त्सुनामीच्या लटांचे तडाखे किनाऱ्याला बसण्याचे अनेक व्हिडीओ आता सोशल नेटवर्किंगवर व्हायरल झाले आहेत. त्यातही एका किनाऱ्यावर एक बॅण्डचा कार्यक्रम सुरु असतानाच त्सुनामी आल्याने संपूर्ण स्टेजच लाटेत वाहून गेल्याचा व्हिडीओही समोर आला आहे.
जावा बेटांच्या पश्चिम किनाऱ्यावर असणाऱ्या तांजुंग लीसुंग बीच रिसॉर्टमध्ये ही त्सुनामीच्या लाटा धडकल्या तेव्हा ‘बॅण्ड सेव्हेन्टीन’ या बॅण्डचा परफॉर्मन्स सुरु होता. अनेकजण या कार्यक्रमाचा आनंद घेत होते. मात्र अचानकच किनाऱ्याला धडकणाऱ्या लाटांनी संपूर्ण स्टेजच वाहून नेला. समु्द्राचे पाणी सामान्यपणे स्टेज बांधलेल्या जागेपर्यंत येत नाही त्यामुळे अचानक एवढी मोठी लाट आल्याने सर्वच जण धावपळ करुन लागले.
