आयआयटी मुंबईच्या १९९३ बॅचच्या विद्यार्थ्यांनी त्यांच्या पदवीला २५ वर्षं पूर्ण झाल्यबद्दल तब्बल २५ कोटींची देणगी दिली आहे. पहिल्यांदाच कोणत्यातरी बॅचने इतकी मोठी रक्कम देणगी म्हणून दिली असून यामुळे आयआयटीचे अनेक प्रकल्प मार्गी लागणार आहे.
आयआयटी मुंबईही देशातील अत्यंत जुनी आणि नामवंत अभियांत्रिकी संस्था आहे. जगातल्या नावाजलेल्या शैक्षणिक संस्थांमध्ये तिची गणना होते. आयआयटीतून शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांनी पदवीला २५ वर्षं पूर्ण झाल्यानंतर आयआयटीला मोठी देणगी देण्याची प्रथा आहे. प्रत्येक बॅचला २५ वर्ष झाल्यानंतर ते मोठी रक्कम आयआयटीला देतात. या रकमेतून प्रयोगशाळांची निर्मिती, नवीन इमारतींची निर्मिती आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे गरजू विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तींची व्यवस्था करण्यात येते. १९९२च्या बॅचने तब्बल ९ कोटी रुपयांची देणगी दिली होती तर १९९८च्या बॅचने आतापासूनच १.६ कोटी देण्यास मंजूरी दिली आहे. १९९३च्या बॅचच्या ८५० विद्यार्थ्यांपैकी १४० विद्यार्थ्यांनी या देणगीला हातभार लावला आहे. ए९१ सोल्युशन्सचे संस्थापक आणि माजी विद्यार्थी अभय पांडे यांनी सर्वाधिक १० कोटी रुपयांची देणगी दिली आहे. आम्हाला ज्या दर्ज्याचे शिक्षण मिळालं ते या देशातील प्रत्येक गरजू विद्यार्थ्याला मिळण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत अशी भावना या सर्वांनीच व्यक्त केली आहे. नुकताच रौप्य मोहोत्सवी वर्षाचा एक कार्यक्रमही नुकताच पार पडला आहे.
