बहिणीने प्रेमविवाह केल्याने संतापलेल्या भावाने मित्राच्या मदतीने मेहुण्याची हत्या केल्याची घटना बीडमध्ये घडली होती. याप्रकरणी पोलिसांनी कारवाई करत एका आरोपीला अटक केली आहे. कृष्णा क्षीरसागर असं या आरोपीचं नाव आहे. स्थानिक गुन्हे शाखेने ही अटकेची कारवाई केली आहे. कृष्णा क्षीरसागर याच्यावर मुख्य आरोपी बालाजी लांडगेला सहकार्य केल्याचा आरोप आहे. मुख्य आरोपी बालाजी लांडगे आणि संकेत वाघ अद्यापही फरार आहेत. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
काय आहे प्रकरण –
बीडच्या तालखेड येथे राहणारा सुमित वाघमारे हा आदित्य अभियांत्रिकी महाविद्यालयात तृतीय वर्षात शिक्षण घेत होता. महाविद्यालयात त्याच्याच वर्गात शिकणाऱ्या भाग्यश्री लांडगे या तरुणीशी सुमितची ओळख झाली. या ओळखीचे रुपांतर प्रेमसंबंधांमध्ये झाले. दोन महिन्यांपूर्वी सुमित आणि भाग्यश्रीने कोर्टात जाऊन विवाह केला. या विवाहाला भाग्यश्रीच्या कुटुंबीयांचा विरोध होता. भाग्यश्रीचा भाऊ बालाजी लांडगे याला देखील हा विवाह खटकत होता.
बुधवारी सुमित आणि भाग्यश्री हे दोघे परीक्षेसाठी महाविद्यालयात आले होते. परीक्षा संपवून दोघेही महाविद्यालयाच्या गेटजवळ येताच बालाजी लांडगे आणि त्याचा एक साथीदार तिथे पोहोचले. दोघेही एका कारमधून आले. त्यांनी सुमितवर तीक्ष्ण हत्यारांनी वार केले आणि पळ काढला. डोळ्यादेखत पतीवर हल्ला झाल्याने भाग्यश्रीला सुरुवातीला नेमके काय घडले हेच कळले नाही. रिक्षाचालक आणि स्थानिकांच्या मदतीने तिने पतीला रुग्णालयात दाखल केले. मात्र, रक्तस्त्राव अधिक झाल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.
सुमित आणि भाग्यश्रीच्या कुटुंबीयांमध्ये यापूर्वीही अनेकदा वाद झाले होते. सुमितच्या हत्येची बातमी समजताच त्याच्या कुटुंबीयांनीही रुग्णालयात गर्दी केली होती. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून रुग्णालय परिसरात मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
