वसतिगृहात राहणाऱ्या २२ वर्षीय तरूणीचा निर्घृणपणे खून, औरंगाबादमधील घटना

वसतिगृहात राहणाऱ्या २२ वर्षीय तरूणीचा गळा आवळून निर्घृणपणे खून करण्यात आल्याची खळबळजनक घटना मंगळवारी (दि.११) रात्री एमजीएम महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्ये घडली. वसतिगृहात राहणाऱ्या तरूणीचा गळा आवळून खून केल्याप्रकरणी अज्ञात मारेकऱ्यांविरूध्द सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया बुधवारी (दि.१२) सायंकाळी उशिरापर्यंत सुरू होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आकांशा अनिल देशमुख (वय २२, रा.झेंडा चौक, माजलगांव, जि.बीड, ह.मु. गंगा हॉस्टेल, रूम नंबर २१३) ही तरूणी एमजीएम महाविद्यालयात फिजीओथेरेपी या अभ्यासक्रमाच्या तृतीय वर्षात शिकत होती. मंगळवारी रात्री नऊ वाजता वसतिगृहातील विद्यार्थीनींची हजेरी घेण्याचे काम सुरू होते, त्यावेळी आकांशा गैरहजर असल्याने वसतिगृह अधिक्षकांना संशय आल्याने त्यांनी आकांशा खोलीत जावून बघीतले असता, ती बेडवर बेशुध्दावस्थेत पडून असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. वसतिगृह अधिक्षकांनी या घटनेची माहिती तात्काळ एमजीएम संस्थेच्या विश्वस्तांना आणि आकांशाचा भाऊ राहुल देशमुख याला दिली. घटनेची माहिती मिळताच राहुल देशमुख याने वसतिगृहात धाव घेवून बेशुध्दावस्थेत असलेल्या आकांशाला उपचारासाठी एमजीएम रूग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मयत घोषीत केले.

दरम्यान, आकांशा देशमुख हिचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी घाटीत हलविण्यात आल्यावर बुधवारी शवविच्छेदन करण्यात आले. आकांशाचा मृत्यू गळा आवळल्यामुळे झाला असल्याचा अहवाल घाटीतील शवविच्छेदन करणाऱ्या डॉक्टरांनी दिला. याप्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात अज्ञात मारेकऱ्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

एमजीएमकडून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न
एमजीएम महाविद्यालयाच्या कॅम्पसमध्ये राहणाऱ्या आकांशा देशमुख हिचा मृत्यू झाला असल्याची माहिती समजताच विविध दैनिकाच्या प्रतिनिधींनी घाटी रूग्णालयात धाव घेतली होती. त्यावेळी एमजीएम महाविद्यालय प्रशासनाकडून प्रसिध्दी माध्यमांच्या प्रतिनिधींना माहिती देण्यास टाळाटाळ करण्यात येवून प्रकरण दडपण्याचा प्रयत्न करण्यात येत होता. तसेच आकांशाच्या नातेवाईकांना भेटण्यास मज्जाव करण्यात येत होता. दरम्यान, एमजीएम महाविद्यालयाचे विश्वस्त अंकुशराव कदम यांनी घाटी रूग्णालयात जावून आकांशा देशमुख हिच्या नातेवाईकांंचे सांत्वन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *