‘आधार’ला प्रतीक्षा चार महिन्यांची

‘आधार’ला प्रतीक्षा चार महिन्यांची

गॅस सबसिडीसाठी बँकेत…, मतदानासाठी मतदार यादीशी… आणि विद्यार्थ्यांचे शाळेत जोडणीसाठी… आधार कार्डची मागणी केली जात असली, तरी पुणेकरांना त्यासाठी तब्बल चार महिने ‘वेटिंग’वर राहावे लागत आहे. पालिकेतर्फे शहरात सध्या केवळ तीनच ठिकाणी आधार कार्ड काढण्याची सुविधा पुरविण्यात आली असून, अनेक नागरिकांना थेट नोव्हेंबरअखेरची ‘अपॉइंटमेंट’ मिळाली आहे.

केंद्र सरकारच्या विविध सेवा-सुविधांचे लाभ थेट लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी आधार योजना सुरू झाली. गॅस सबसिडी प्राप्त करण्यासाठी बहुतेक नागरिकांनी आधार बँकेशी लिंक केले आहे. गेल्या काही दिवसांपासून मतदारयादीशी आधार जोडण्याची प्रक्रिया सुरू आहे; तसेच अनेक शाळांमधून विद्यार्थ्यांचे आधार सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शहरातील तब्बल ८४ टक्के नागरिकांना आधार कार्ड मिळाले असले, तरी उर्वरित नागरिकांना मात्र ते मिळविण्यासाठी अनेक खटाटोप करावे लागत आहेत.

पालिकेतर्फे सध्या अवघ्या तीनच ठिकाणी आधारसाठी आवश्यक नोंदणी प्रक्रिया सुरू आहे. वारजे-कर्वेनगर आणि टिळक रोड क्षेत्रीय कार्यालयात; तसेच घोले रोड क्षेत्रीय कार्यालयांतर्गत फर्ग्युसन कॉलेज समोरील इमारतीत आधारची नोंदणी सुरू आहे. परंतु, या सर्व ठिकाणी एकच मशीन असल्याने नोंदणीसाठी गेलेल्या नागरिकांना पुढची अपॉइंटमेंट दिली जात आहे. या अपॉइंटमेंटसाठी नागरिकांना तब्बल महिना-दीड महिन्याची प्रतीक्षा करावी लागत असून, वारजे-कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालयात आधार नोंदणीसाठी येणाऱ्या नागरिकांना नोव्हेंबरची वेळ दिली जात आहे.

दरम्यान, पालिकेने वारंवार मागणी करूनही जिल्हाधिकाऱ्यांतर्फे जादा मशीन उपलब्ध करून देण्यात आलेली नाहीत. त्याचा ताण सध्याच्या व्यवस्थेवर येत आहे. ही अडचण दूर करण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी माहिती पालिकेचे उपायुक्त प्रकाश बोरसे यांनी दिली.

सध्या जिल्ह्यात मतदारयाद्या आधारशी जोडण्याचे काम सुरू असल्याने जादा मशीन देण्यात असमर्थतता दर्शविण्यात आली आहे. जादा मशीन मिळताच, नागरिकांच्या सोयीसाठी उपलब्ध करून दिली जातील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *