तैवानमधील पूर्वोत्तर भागात रविवारी संध्याकाळी भीषण रेल्वे अपघात झाला. एक्स्प्रेसचे डबे रुळावरुन घसरल्याने हा अपघात झाला असून या अपघातात १८ प्रवासी ठार झाले. तर १७१ प्रवासी जखमी झाले आहेत. तैवानमधील गेल्या २० वर्षांमधील हा सर्वात भीषण रेल्वे अपघात आहे.
तैपेईतील उपनगरामधून तायतूंग येथे जाणाऱ्या पुयूमा एक्स्प्रेसचे आठ डबे रविवारी संध्याकाळी (भारतीय वेळेनुसार) रुळावरुन घसरले. या ट्रेनमध्ये एकूण ३६६ प्रवासी होते. या भीषण अपघातात १८ प्रवाशांचा मृत्यू झाला. तर १७१ प्रवासी जखमी झाले. शिनमा स्टेशनजवळ हा अपघात झाला. एका जखमी प्रवाशाने रॉयटर्स या वृत्तसंस्थेला प्रतिक्रिया दिली. ‘ट्रेन वळणावर होती. मात्र, तरीदेखील ट्रेनचा वेग कमी होत नव्हता. या अपघातात मी ट्रेनमधून बाहेर फेकला गेलो. नेमकं काय घडतंय हे कोणालाच कळलं नाही, असे जखमी प्रवाशाने सांगितले.
डब्याखाली अडकलेल्या सर्व प्रवाशांना बाहेर काढण्यात आले आहे. डबे रुळावरुन हटवण्याचे काम सुरु असल्याचे स्थानिक प्रशासनाने सांगितले. तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने घटनास्थळी मदतकार्यासाठी १२० जवानांना पाठवले आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. या अपघाताची चौकशी सुरु आहे, असे तैवानमधील रेल्वे प्रशासनाने म्हटले आहे. तैवानच्या राष्ट्राध्यक्षांनीही या अपघातावर शोक व्यक्त केला आहे.
