साताऱ्यात रंगला डॉल्बीचा वाद, उदयनराजेंच्या आव्हानानंतर सातारा पोलीस रस्त्यावर

गणपती विसर्जन मिरवणुकीत डीजे आणि डॉल्बीच्या वापरास परवानगी देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने तूर्तास नकार दिला आहे. न्यायालयाच्या आदेशानंतरही साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले गणेशोत्सवामध्ये डॉल्बी वाजवण्याच्या आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. कुठल्याही परिस्थितीत डॉल्बी वाजवणारच अशी भूमिका घेत सातारा शहरातील गणपतीचं मंगळवार तळ्यात विसर्जन करणार असल्याची भूमिका उदयनराजेंनी घेतली आहे. दरम्यान उदयनराजेंनी घेतलेल्या भूमिकेला सातारा पोलिसांनी आव्हान दिलं असून रस्त्यावर उतरले आहेत.

सातारा पोलिसांनी डॉल्बीविरोधात रॅली काढत पुन्हा एकदा आपली भूमिका स्पष्ट केली आहे. विशेष म्हणजे या रॅलीत सातारा जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक पंकज देशमुखदेखील सहभागी झाले होते. सातारा पोलिसांनी शहरातून ही रॅली काढली. यासाठी त्यांनी शाळकरी मुलांना सहभागी करुन घेतलं होतं. पोलीस अधिक्षक पंकज देशमुखदेखील रॅलीत सहभागी झाल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं.

पोलिसांनी काढलेल्या रॅलीमुळे साताऱ्यात उदयनराजे विरुद्ध पोलीस सामना रंगण्याची शक्यता आहे. एकीकडे उदयनराजे यांनी काही केलं तरी डॉल्बी वाजवणारच अशी भूमिका घेतल्याने पोलीस कशा पद्धतीने परिस्थिती हाताळणार हे पहावं लागणार आहे.

मी पळपुटा नाही – उदयनराजे भोसले
न्यायलयाने घेतलेल्या निर्णयाला विरोध करण्यासाठी आपण पूर्णपणे तयार असल्याचे उदयनराजे यांनी सांगितले आहे. न्यायालयाचे अवमान झाला तरी त्यासाठी मी समर्थ आहे. मी पळपुटा नाही. कार्यकर्त्यांच्या पाठीशी मी ठाम उभा राहणार आहे असेही उदयनराजेंनी सांगितले.

गणेशोत्सव कायद्याच्या चौकटीत राहूनच साजरा केला जाईल – विश्वास नांगरे पाटील
एकीकडे उदयनराजे डॉल्बी वाजवण्यावर ठाम असताना दिसत आहेत तर दुसरीकडे पोलिसांनीही डॉल्बी वाजवू देणार नाही असे स्पष्ट केले आहे. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी पत्रकार परिषदेमध्ये पोलिसांची डॉल्बीविरोधी भूमिका प्रसारमाध्यमांसमोर स्पष्ट केली होती. गणेशोत्सव शांततेमध्ये कायद्याच्या चौकटीत राहूनच साजरा केला जाईल अशी आशा नांगरे पाटील यांनी व्यक्त केली आहे. न्यायालयाने आखून दिलेल्या नियमांचे पालन करुनच गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केलं होतं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *