अंबरनाथनंतर आता बदलापूर ओम साई स्नॅक्सच्या वडापावमध्ये पाल सापडल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. कुळगाव-बदलापूर नगरपालिकेच्या आरोग्या विभागाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून ओम साई स्नॅक्सच्या दुकानाला सील ठोकले आहे.
ओम साई स्नॅक्समध्ये एक ग्राहक सोमवारी वडापाव खाण्यासाठी गेला होता. यावेऴी त्याला वडापावमध्ये पाल आढळली. त्याने ओम साई स्नॅक्सच्या मालकाशी यावरून वादही घातला. मात्र, कोणत्याही यंत्रणेला कळविले नव्हते. या प्रकाराचे फोटो सोशल मिडीयावरून व्हायरल झाल्याने मंगळवारी अखेर कुळगाव-बदलापूर नगरपालिकेच्या आरोग्या विभागाने याची दखल घेत हॉटेल सील केले. तसेच पोलिसांतही तक्रार दाखल केली आहे.
एफडीएनेही या प्रकरणी ओम साई स्नॅक्सकडून खाद्यपदार्थांचे नमुने घेतले आहेत. यामध्ये काही आढळल्यास दुकान मालकावर कारवाई होणार आहे. तसेच नगरपालिकेने ओम साई स्नॅक्सचा मालक हंसराज चौधरीविरोधात तक्रार दाखल केली आहे.