भाजपा आमदार राम कदम यांच्यावर गुन्हा दाखल करता येईल का ?, त्यांच्यावर नेमक्या कोणत्या कलमांखाली गुन्हा दाखल करता येईल, याबाबत पोलिसांनी कायदेतज्ज्ञांचे मत मागवले आहे.
आमदार राम कदम यांनी सोमवारी दहीहंडी उत्सवात वादग्रस्त विधान केले. एखादी मुलगी तुम्हाला पसंत असेल, पण ती लग्नाला नकार देत असेल तर मला सांगा, तिला पळवून आणण्यात मदत करेन, असे राम कदम यांनी म्हटले होते. राम कदम यांच्या विधानावरुन चोहोबाजूंनी टीका होत आहे. काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेससह विविध महिला संघटनांनी राम कदम यांचा निषेध केला आहे.
मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी घाटकोपर पोलीस ठाण्यात राम कदमांविरोधात तक्रार अर्ज दिला आहे. मनसेच्या वतीने पुरावा म्हणून राम कदम यांच्या भाषणाची क्लिपही सादर करण्यात आली आहे. पोलिसांनी यासंदर्भात आता कायदेतज्ज्ञांचे मत मागवले आहे. ‘घाटकोपर पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षकाने राज्याच्या विधी विभागातील कायदे तज्ज्ञांशी संपर्क साधला आहे. राम कदमांवर कोणत्या कलमांखाली गुन्हा दाखल करता येईल याबाबत आम्ही मत मागवले आहे’, असे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी भारतीय दंड विधानातील कलम २६८, १०८ आणि ५०४ या तीन कलमांखाली गुन्हा दाखल करता येईल का?, याबाबत मत मागवले आहे.
या तीन कलमांतर्गत गुन्हा दाखल होणार?
कलम २६८ अंतर्गत जिच्यामुळे जनतेला किंवा आजूबाजूला राहणाऱ्या लोकांना नुकसान किंवा धोका किंवा त्रास निर्माण होत असेल अशी कृती करणे हा गुन्हा ठरतो. सार्वजनिक आरोग्य, सुरक्षितता अंतर्गत हा गुन्हा ठरतो. कलम १०८ नुसार गुन्हा करण्यास प्रोत्साहन देणे हा देखील गुन्हा ठरतो. तर कलम ५०४ अंतर्गत प्रक्षोभक विधान करुन सार्वजनिक शांतता भंग करणे हा गुन्हा ठरतो. या तीन कलमांअंतर्गत राम कदम यांच्यावर कारवाई करता येईल का, याची चाचपणी पोलिसांनी सुरु केली आहे.
दरम्यान, गुरुवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राम कदमांविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. राम कदमांना अटक झाली नाही तर रास्ता रोको करु असा इशारा मनसेने दिला आहे. घाटकोपर पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे.
