आज भारत चंद्रावर माणूस पाठवण्याची तयारी करत आहे. तर दुसरीकडे भारतातील अंधश्रद्धा आणि अंधविश्वासामुळे घडणाऱ्या घटना आजही कमी होताना दिसत नाहीयत. याचेच एक ताजे उदाहरण म्हणजे दिल्लीमध्ये समोर आलेली धक्कादायक घटना.
दिल्लीमधील आदीबा नावाच्या २७ वर्षीय महिलेने आपल्या सात महिन्याच्या मुलीचा जीव घेतला. या घटनेमागील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे मुलीच्या जन्मापासून घरामधील अनेकांच्या तब्बेतीसंदर्भातील आणि आर्थिक अडचणी वाढल्याने मुलीच्या जन्मामुळेच हे घडत असल्याने तिची हत्या केल्याचे कबुली या महिलेने दिली आहे.
२० ऑगस्ट रोजी आपल्या मुलीची हत्या केल्यानंतर हा एक अपघात असल्याचे दाखवण्याचा आदीबाने प्रयत्न केला. आपली मुलगी पाण्यात बुडल्याचे सांगताना ती मुलीला दिल्लीतीलच मुच्छलचंद रुग्णालयात घेऊन गेली. मुलीची नाजूक परिस्थिती पाहून डॉक्टरांनी पोलिसांना या प्रकाराबद्दल कळवले. मुलीला दाखल करुन घेतल्यानंतर लगेचच तिचा मृत्यू झाला. मात्र मुलीच्या गळ्यावर व्रण दिसल्याने पोलिसांना हा अपघात नसल्याचा संशय पोलिसांना आला. या मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. शिवविच्छेदनाच्या अहवालानुसार या मुलीचा मृत्यू गळा दाबल्याने झाल्याने उघड झाले. त्यानंतर पोलिसांनी आदिबाला ताब्यात घेऊन चौकशी केली. त्यावेळी तिने आपला गुन्हा कबुल केला.
पोलिसांसमोर आपला गुन्हा कबुल करताना आदिबाने आपणच आपल्या मुलीची हत्या केल्याचे सांगितले. या मुलीच्या जन्मामुळे आमच्या घराला वाईट दिवस सुरु झाले. घरातील परिस्थिती सुधारण्यासाठी मुलीची हत्या करण्याशिवाय इतर कोणताही पर्याय आपल्याला दिसला नाही असे सांगतानाच ओढणीने गळा दाबून आपण मुलीला मारल्याची कबुली तिने दिली. घरात कोणीही नसताना ओढणीने मुलीचा गळा आवळला आणि नंतर ती पाण्यात बुडून मेल्याचे दाखवण्यासाठी तिचा मृतदेह पाण्याच्या ड्रममध्ये बुडवल्याचे तिने सांगितले. पोलिसांना तसापणीदरम्यान हत्येसाठी वापरण्यात आलेली ओढणीही सापडली आहे. पोलिसांनी आदिबाला हत्येच्या गुन्ह्याखाली अटक केली आहे.
