शंभर रुपयाच्या वादातून हमालाची हत्या

शंभर रुपयांच्या कमिशनवरून झालेला वाद हमालाच्या जिवावर बेतला. वांद्रे टर्मिनस येथे टॅक्सीचालकाने केलेल्या हल्ल्यात विजय देढवाल या हमालाचा मृत्यू झाला. याप्रकरणी निर्मल नगर पोलिसांनी मोहम्मद इम्रान या टॅक्सी चालकाला शनिवारी रात्री अटक केली.

वांद्रे टर्मिनस येथे टॅक्सी चालकांची  प्रवाशांना घेण्यासाठी नेहमीच स्पर्धा असते. प्रवासी मिळावेत यासाठी हे टॅक्सीचालक हमालांना कमिशन देऊन प्रवासी आणण्यास सांगतात. शुक्रवारी रात्री आठ वाजता हमाल शंकर उर्फ जग्गा हा काही प्रवासी घेऊन टॅक्सी स्टॅण्डवर आला. त्याने या प्रवाशांना टॅक्सीत बसविले आणि इम्रान याच्याकडे शंभर रुपये कमिशन मागितले. इम्रान याने पैसे देण्यास नकार दिल्यामुळे दोघांमध्ये जोरदार भांडण झाले. यावेळी इम्रान याने शंकर याला मारहाण केली.

याबाबत समजल्यानंतर दुसरा हमाल विजय देढवाल इम्रानला जाब विचारण्यासाठी गेला. यावेळी संतापलेल्या इम्रानने विजयवर चाकूने वार केले. गंभीर जखमी झालेल्या विजयला उपचारासाठी व्ही. एन. देसाई रुग्णालयात नेण्यात आले. पण दाखल करण्यापूर्वी त्याचा मृत्यू झाला. इम्रान याला इतर हमाल आणि चालकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले. इम्रान याच्यावर हत्येचा गुन्हा दाखल केल्याचे निर्मल नगर पोलिसांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *