ई-मेल हॅक; ४१ लाखांची फसवणूक

शहरातील स्थानिक कंपनीच्या यूकेतील (युनायटेड किंगडम) एका कंपनीशी झालेल्या करारा अंतर्गत आर्थिक व्यवहारातील सुमारे ४१ लाखांची रक्कम संबंधित कंपनीचे ई-मेल खाते हॅक करत बनावट खाते तयार करून परस्पर वर्ग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रक्कम संबंधित कंपनीला मिळाली नसल्याचे लक्षात आल्याने जळगावातील कंपनी चालकाने या प्रकरणी पोलिसांत तक्रार दिली व गुन्हा नोंदविला आहे.

शहर पोलिस ठाण्यात स्टार कुलर्स अॅण्ड कंडेन्सर कंपनीचे संचालक सुशील कुमार ओमकुमार असोपा (वय ५५) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार स्थानिक ‘स्टार कुलर्स’ आणि युकेची कंपनी ‘स्टार फ्रॉस्ट’ या दोघा कंपन्यांमध्ये उत्पादन, तांत्रिक मदतीसह प्रचलित डिझाइन खरेदीच्या व्यवहारासंदर्भात करार झाला होता. ठरलेल्या करारानुसार, स्टार कुलर्सकडून त्यांच्या ई-मेल खात्यावरून स्टार फ्रॉस्ट कंपनीच्या खात्यावरून ७ ते १६ ऑगस्टदरम्यान ऑर्डर इतर देवाणघेवाणबाबतचे संभाषण करण्यात येत होते. मात्र, हॅकर्सद्वारे स्टार कुलर्सचा ई-मेल हॅक करून झालेल्या व्यवहारावर नजर ठेवून यूकेच्या स्टार फ्रॉस्ट कंपनीशी मिळताजुळते नवे ई-मेल खाते तयार करण्यात आले. त्याद्वारे संपर्क साधून कंपनीला स्टार फ्रॉस्ट (युके) ला देणे असलेली रक्कम ४६ लाख ११ हजार ८०० ब्रिटन पाऊंड रक्कम स्वत:च्या बनावट बँक खात्यात वर्ग करून घेत फसवणूक केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *