चोरट्याने दिलेल्या धक्क्याने फलाटावर पडून विद्यार्थिनी जखमी

रेल्वेमध्ये महिला सुरक्षेचा प्रश्न काही केल्या सुटताना दिसत नाही. महिलांच्या प्रथम श्रेणीच्या डब्यातून प्रवास करणाऱ्या दोन विद्यार्थिनीं जीवघेण्या प्रसंगातून थोडक्यात बचावल्या. ही घटना मध्य रेल्वे मार्गावर मुंब्रा स्थानकाजवळ घडली. एक चोरटा इसम महिलांच्या डब्यात शिरला. त्याने विद्यार्थीनीच्या हातातला मोबाईल खेचला. पण, त्याला विद्यार्थिनीने विरोध करताच त्याने तिला धक्का दिला. या झटापटीत विद्यार्थिनी गाडीतून बाहेर फलाटावर पडली. या घटनेत विद्यार्थिनी गंभीर जखमी झाली. प्रवाशांच्या मदतीने तिला रूग्णालयात दाखल करण्यात आले. तर, ठाणे लोहमार्ग पोलिसांनी २४ तासांतच या चोरट्याला अटक केली.

पीडिता ठाण्यातील बेडेकर कॉलेजची विद्यार्थिनी

प्राप्त माहितीनुसार, सुस्मिता ओनकर असे जखमी विद्यार्थीनीचे नाव आहे. ती ठाण्यातील बेडेकर कॉलेजची विद्यार्थिनी असून, बीएमएसच्या प्रथम वर्षात शिकते. अंबरनाथमध्ये आनंदविहार परिसरात ती राहते. शुक्रवारी सकाळी सुस्मिता आणि तिची मैत्रिण ऋतुजा अशा दोघी ठाण्याहून कल्याणला रेल्वेने निघाल्या होत्या. त्यासाठी त्यांनी ठाणे रेल्वे स्थानकातून ८.४४ वाजताची गाडी घेतली. या गाडीतून त्या प्रथम श्रेणी डब्यातून प्रवास करत असताना डब्यात दोघींशिवाय कोणीही सहप्रवासी नव्हते. नेमकी हिच संधी चोरट्याने साधली.

डोक्याला गंभीर इजा

गाडी मुंब्रा स्थानकात येताच चोरटा गाडीच्या डब्यात शिरला. त्याने सुस्मिताच्या हातातील सुमारे ७० हजार रूपयांचा आयफोन खेचला आणि तो पळू लागला. पण, सुस्मिताने त्याला प्रतिकार केला. या वेळी झालेल्या झटापटीत बळाचा वापर करत चोरट्याने सुस्मिताला डब्याबाहेर ढकलले आणि पळ काढला. हा प्रकार सुरू असताना गाडी सुरू होती. डब्याबाहेर पडलेल्या सुस्मिताला फलाटावरील प्रवाशांनी मुंब्रा येथील खासगी रूग्णालयात दाखल केले. तिच्या डोक्याला गंभीर इजा झाली असून, पुढील उपचारासाठी तिला मुलुंडच्या फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

चोरट्याला २४ तासात अटक

दरम्यान, घडल्या प्रकाराची माहिती कळताच ठाणे लोहमार्ग पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला आणि वेगाने तपासचक्रे फिरवली. यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र शिरतोडे, पोलीस निरीक्षक स्मिता ढाकणे यांच्या पथकाने वेगवान कामगिरी करत चोरट्याला ताब्यात घेतले. अवघ्या चोवीस तासात पथकाने चोरट्याचा पर्दाफाश केला. सोहल रफिक अन्सारी असे चोरट्याचे नाव असून, त्याला मुंब्र्यातून अटक करण्यात आली. आरोपीकडून आयफोनही जप्त करण्यात आला. आरोपी हा गुन्हेगारी वृत्तीचा असून, त्याच्यावर यापूर्वीह चोरीचे तीन गुन्हे नोंद असल्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक शिरतोडे यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *