सख्ख्या काकीनेच केले पुतण्याचे अपहरण

आर्थिक चणचण दूर करण्यासाठी कुर्ला येथे सख्ख्या काकीनेच पुतण्याचे अपहरण केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आपल्या साथीदारांच्या मदतीने तिने १३ वर्षीय पुतण्याला दोन दिवस अन्नपाण्याशिवाय डांबून ठेवले. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेला याची माहिती मिळाल्यानंतर गोवंडी शिवाजीनगरमधून या मुलाची सुखरूप सुटका करण्यात आली. पोलिसांनी याप्रकरणी काकीसह तिच्या चार साथीदारांना सोमवारी अटक केली.

कुर्ला पश्चिमेला राहणाऱ्या एका कुटुंबाने त्यांचा आठवीत शिकणारा मुलगा हरविल्याची तक्रार ३ ऑगस्ट रोजी विनोबा भावे नगर पोलिस ठाण्यात नोंदवली. अल्पवयीन मुलगा गायब झाल्याने गंभीर दाखल घेत पोलिस आणि गुन्हे शाखेच्या पथकानेही या मुलाचा शोध सुरू केला. दिवसरात्र पोलिस शोध घेत होते, मात्र या मुलाचा काहीच पत्ता लागत नव्हता. त्याच दरम्यान शिवाजी नगर पोलिस ठाण्याच्या मागील बाजूस असलेल्या नटवर कम्पाऊंडमध्ये संशयास्पद हालचाली सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट चारचे पोलिस हवालदार कृष्णा नार्वेकर यांना मिळाली. प्रभारी पोलिस निरीक्षक संदेश रेवले, सहायक निरीक्षक विनोद माळवे, अंमलदार शिरगावकर, गुरव, बल्लाळ यांच्या पथकाने नटवर कम्पाऊंडमधील एका व्यावसायिक गाळ्यात छापा टाकून या ठिकाणी डांबून ठेवलेल्या मुलाची सुटका केली. याप्रकरणी पोलिसांनी सुलतान खान, जहांगीर शेख, विल्यम सिद्दिकी, गुफरान शेख यांना अटक केली. चौकशीत या मुलाची काकी शबीना खान हिचे नाव पुढे आले.

दिरापेक्षा श्रीमंत व्हायचे होते

शबीना हिचा पती वाहनचालक असून तिची आर्थिक परिस्थिती बेताची आहे. दिराचा व्यवसाय असल्याने त्याची आर्थिक परिस्थिती चांगली होती. पुतण्याचे अपहरण करून दिराकडे २ कोटी रु.ची मागणी करायची व ५० लाखांवर तडजोड करायची, असे शबाना हिने ठरविले होते, अशी माहिती पोलिस उपायुक्त दिलीप सावंत यांनी दिली.

हत्या करण्याचा विचार

या मुलाच्या वडिलांना संपर्क साधण्यासाठी अपहरणकर्ते बोगस कागदपत्रांवर सिम कार्ड मिळविण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र ओळखपत्र सक्तीचे असल्याने त्यांना सिम कार्ड मिळाले नाही. हा मुलगा १३ वर्षांचा असल्याने त्याने सर्वांना ओळखले होते. पैसे मिळाले किंवा नाही मिळाले, तरी या मुलाची हत्या करून पुरावा नष्ट करण्याचे त्यांनी ठरविले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *