एक्सप्रेस वेवर रस्ता खचल्याने नवीकोरी गाडी १५ फूट खोल खड्ड्यात पडली

उत्तर प्रदेशमधील ‘आग्रा- लखनौ एक्सप्रेस वे’चा काही भाग आज सकाळच्या सुमारास खचला. हा रस्ता खचल्यामुळे रस्त्यावरून भरधाव वेगाने जाणारी एक एसयुव्ही गाडी चक्क १५ ते २० फूट खोल खड्ड्यात अधांतरी अडकली. गाडी न कलंडता जागेवरच १५ ते २० फूट खाली गेल्याने गाडीतील सर्व प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले. विशेष म्हणजे ही नवीन गाडी असल्याची माहिती समोर येत आहे. पहिल्यांदाच ही एसयुव्ही गाडी घेऊन चार जणांचे कुटुंब किन्नौरच्या दिशेने निघाले असतानाचा हा अपघात झाला.

एक्सप्रेस वेवर आग्रा शहरापासून १६ किलोमीटरवर असणाऱ्या डौकी भागातील वाजिदपूर पुलाजवळ हा अपघात घडला. काही दिवसांपूर्वीच घेतलेली ही नवीन गाडी घेऊन एकाच कुटुंबातील चार जण मुंबईहून किन्नौजला जात होते.  गाडीतील प्रवाशांपैकी एक असणाऱ्या रचितने प्रसारमाध्यमांना दिलेल्या माहितीनुसार गाडीत एकूण चार जण होते. कोणालाही मोठी दुखापत झाली नसली तरी ही गाडी नवीन आहे. पहिल्यांदाच रस्ते मार्गाने किन्नौरला येत असल्याने हे लोक जीपीएसच्या मदतीने प्रवास करत होते. एक्सप्रेस वेला लागल्यानंतर अचानक जीपीएसचा सिग्नल गेला आणि गाडी सर्व्हिस रोडला गेली.

ब्रेक लावण्याआधीच…

जीपीएसचा सिग्नल गेल्याने कोणालातरी पत्ता विचारण्याच्या हेतूने सर्व्हिस रोडने वेगाने गाडी जात होती. आम्हाला समोर निर्मनुष्य रस्ता दिसत होता. रस्त्यावर कोणाताही खड्डा वगैरे नसल्याने गाडी वेगाने जात होती असे रचितने सांगितले. आणि अचानकच रस्ता खचला. वेगाने जाणारी गाडी थांबवण्यासाठी चालकाने ब्रेक लावण्याआधीच गाडी १५ ते २० फूट खोल खड्ड्यात अडकली होती.

स्थानिकांनी केली मदत

रस्ता खचल्याची माहिती मिळताच स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेतली. काहींनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली तर काहींनी गाडीत अडकलेल्यांना सुखरुप बाहेर काढले. गाडी थोडी जरी वेडीवाकडी पडली असती तर गाडी आणखीन खाली घसरून एखाद्या प्रवाशाचा जीव गेला असता अशी माहिती स्थानिकांनी प्रसारमाध्यमांना दिली.

विक्रमी वेळेत पूर्ण झालेला एक्सप्रेस वे

उत्तर प्रदेशमध्ये अखिलेश यादव यांचे सरकार असताना अवघ्या २२ महिन्यांच्या कालावधीमध्ये हा ३०२ किलोमीटरचा एक्सप्रेस वे बांधण्यात आला होता. हा हायवे बांधण्यासाठी १३ हजार २०० कोटींचा खर्च आला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *