ओलाचालकानं महिला प्रवाशाचे कपडे काढून फोटो केले व्हायरल

महिला प्रवाशाचा विनयभंग केल्याचा ठपका ठेवत बेंगळूर पोलिसांनी ओला चालकाला अटक केली आहे. एक जूनरोजी हा प्रकार घडला असून या महिलेनं घरापासून विमानतळावर जाण्यासाठी ओला बुक केली होती. याप्रकरणी आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विमानतळाकडे जाताना ओला चालकानं चुकीच्या रस्त्याने कार नेली. हा मार्ग लवकर पोचवतो असं या महिलेला त्यानं सांगितलं.

विमानतळाच्या आधी निर्मनुष्य जागी ओलाचालकानं गाडी थांबवली असं या महिलेनं पोलिसांना सांगितलं. तिच्यावर बंद कारमध्ये हल्ला केला. तिचा फोन त्यानं काढून घेतला तसेच आरडाओरडा केलास तर मित्रांना बोलावून सामूहिक बलात्कार करू अशी धमकीही त्यानं दिल्याचा आरोप या महिलेनं केला आहे. तिचा मोबाईलही त्यानं हिसकावून घेतला.

त्यानंतर या ड्रायव्हरनं तिला कपडे काढण्यास भाग पाडले. तिचे त्या अवस्थेतले काही फोटो काढून ते त्यानं व्हॉट्स अॅपवर शेअरही केले. या घटनेचा निषेध करत ओला कंपनीनं आरोपी ड्रायव्हरला काळ्या यादीत टाकल्याचं सांगितलं. आमच्या ग्राहकाला अशा प्रसंगाला सामोरे जावं लागलं हे दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया ओलानं व्यक्त केली आहे. ग्राहकांची सुरक्षितता आमचं प्राधान्य असून या चालकाला आम्ही ब्लॅकलिस्ट केल्याचं ओलानं म्हटलं आहे. तसेच या गुन्ह्याच्या तपासात पोलिसांना संपूर्ण सहकार्य करण्याचं आश्वासनही कंपनीनं दिलं आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *