कळवा खाडीपुलाच्या बांधकामाच्या पाश्र्वभूमीवर या मार्गावर २० फूटपेक्षा अधिक उंचीच्या वाहनांना जाण्यास प्रतिबंध करणाऱ्या खांबाला एका अवजड वाहनाची धडक बसून तो खाली पडला. सोमवारी सकाळी झालेल्या या अपघातानंतर कळवा नाका परिसरात प्रचंड वाहतूक कोंडी पाहायला मिळाली.
कळव्यातील तिसरा खाडी पूल उभारणीच्या कामामुळे या ठिकाणी २० फूट उंचीपेक्षा जास्त उंचीच्या वाहनांमुळे अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात होती. त्यामुळे संभाव्य अपघात टाळण्यासाठी वाहतूक पोलिसांनी या ठिकाणी २० फूट उंचीच्या वाहनांना प्रवेश बंदी केली आहे. त्यासाठी पुलाच्या परिसरात या ठिकाणी उंची रोधक (हाइट बॅरिकेड) बसविण्यात आले आहेत. कळवा पुलाच्या दोन्ही बाजूला हे रोधक बसविण्यात आले आहेत. रात्रीच्या वेळेस वाहनचालकांना हे रोधक दिसावेत यासाठी त्यावर लाल दिव्यांची माळ लावण्यात आली आहे. असे असतानाही सोमवारी सकाळी सव्वा सहा वाजता एका चालकाने पोलिसांची नजर चुकवत २० फुटापेक्षा जास्त उंची असलेले अवजड वाहन तेथून नेले. साकेत येथून नवी मुंबईच्या दिशेने हे वाहन जात होते. या रोधकामुळे वाहन अडकल्यानंतरही चालकाने वाहन पुढे नेले. त्यामुळे रोधक रस्त्यावर तुटून पडल्यानंतर चालकाने वाहनासह तेथून पळ काढला. मात्र, त्यानंतर अन्य वाहनांना कोंडीला तोंड द्यावे लागले.
रोधक तुटल्यामुळे ऐन गर्दीच्या वेळेत पुलावर कोंडी झाली होती. साकेत तसेच ठाणे कारागृहापर्यंतच्या मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. काही वेळाने वाहतूक पोलिसांनी क्रेनच्या साहाय्याने रोधक बाजूला केले आणि त्यानंतर येथील वाहतूक सुरळीत झाली. ‘तुटलेले उंची रोधक बाजूला करण्यात आले आहे. वाहतूक कोंडी दूर झाल्यानंतर हे रोधक पुन्हा बसविण्यात येईल,’ असे कळवा वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मनोहर आव्हाड यांनी सांगितले.
