अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्र नाहीसे झाल्याने सध्या नैर्ऋत्य मोसमी पाऊस राज्यातून जवळपास गायब झाला आहे. कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक सरी पडल्या असल्या, तरी गेल्या दोन ते तीन दिवसांत कुठेही मोठय़ा पावसाची नोंद होऊ शकली नाही. पुढील संपूर्ण आठवडय़ात राज्यात कोठेही दमदार पाऊस पडणार नाही. अगदी कोकण आणि घाटमाथ्यावरही हलक्या सरीच कोसळतील, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. त्यामुळे पुढील आठवडा कोरडाच जाण्याची शक्यता आहे.
अरबी समुद्रात तीन ते चार दिवसांपूर्वी कमी दाबाचे क्षेत्र कार्यरत होते. मात्र त्याची तीव्रता कमी झाली होती. त्यामुळे कोकणातही पावसाचा जोर कमी झाला होता. सध्या अरबी समुद्रातील कमी दाबाचे क्षेत्र जवळपास नाहीसे झाले आहे. त्याचप्रमाणे बंगालच्या उपसागरातील कमी दाबाचे क्षेत्रही गायब झाल्याने राज्याच्या अंतर्गत भागातूनही पाऊस गायब झाला आहे. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवडय़ातही अशीच स्थिती निर्माण झाली होती. त्या वेळी अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा काहीसा कार्यरत होता. त्यामुळे कोकणात पाऊस झाला. बंगालच्या उपसागरात दोन आठवडय़ांपूर्वी कमी दाबाचे क्षेत्र कार्यरत होते. मात्र हळूहळू त्याची तीव्रता कमी होऊन सध्या ते गायब झाले आहे. दोन्ही भागांत कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होऊन त्याची तीव्रता वाढल्यासच राज्यात जोरदार पाऊस होऊ शकणार आहे. सध्या त्याबाबत कोणतीही चिन्हे दिसून येत नाहीत. पुढील २४ तासांत पूर्व उत्तर प्रदेशात कमी दाबाचे नवीन क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. मात्र त्याचा उत्तर भारताला लाभ मिळू शकेल. राज्यात सध्या तरी पावसासाठी पोषक वातावरण नसल्याचे स्पष्ट करण्यात आले. त्यामुळे राज्यात सर्वदूर पावसाने विश्रांती घेतली आहे.
कोकणात हलक्या सरी
विशेष बाब म्हणजे घाटमाथा, कोकणातही मागील दोन ते तीन दिवसांपासून विशेष पावसाची नोंद झाली नाही. पुढील २४ तासांत दक्षिण कोकणात तुरळक ठिकाणी हलका पाऊस पडणार असून, उर्वरित राज्यात हवामान कोरडे राहणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली.
