मुंबईहून पुण्यात दागिने घेऊन येणाऱ्या रांका ज्वेलर्सच्या ऑफिस बॉयवर चाकूने वार करून एक कोटी ४८ लाखांचे दागिने चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार पुणे स्टेशन येथे शुक्रवारी पहाटे दीडच्या सुमारास घडला. या प्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत अजय मारुती होगाडे (वय २०, रा. सायन,कोळीवाडा, मुंबई) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार चार अनोखळी व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जव्हेरी बाजार येथील शाखेत होगाडे ऑफिस बॉय म्हणून नोकरीला आहे. या शाखेचा व्यवहार सुभाष बिष्णोई पाहतात.
त्यांनी पुण्यातील रांका ज्वेलर्सच्या विविध शाखांसाठी सोन्याचे दागिने असलेले पार्सल घेऊन जाण्यास अजयला सांगितले. त्यानुसार अजय गुरुवारी रात्री सव्वानऊच्या सुमारास दादर स्टेशनवरून पुण्याकडे निघाला. सोन्याचांदीचे दागिने आणि हिरे असलेली चार पार्सलची पाकिटे त्याने बॅगेत ठेवली होती. लोणावळा ओलांडल्यानंतर रात्री साडेबाराच्या सुमारास त्याने बिष्णोई यांना फोन करून आपण अर्ध्या तासात पुणे स्टेशनला पोहोचत असल्याचे कळवले. स्टेशनला पोहोचल्यानंतर अजय प्लॅटफॉर्म क्रमांक सहाचा जिना चढून पाठीमागील रिक्षा स्टँडवर जाऊन थांबला. तेथून बिष्णोई यांना फोन करण्याचा प्रयत्न केला असता, पाठीमागून दोघांनी धक्का दिला आणि दागिन्यांनी भरलेली बॅग हिसकावण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर समोरून आणखी दोघे जण आले. त्यांनीही अजयला मारहाण करण्यास सुरुवात केली. चौघांपैकी एकाने चाकूसारख्या हत्याराने अजयच्या पोटावर वार केला. त्यानंतर झालेल्या झटापटीत चोरट्यांनी पाठीवर वार करून बॅग हिसकावली.
त्यानंतर अजय यांनी आपली सुटका करून जवळ असलेल्या सुरक्षारक्षकाकडे धाव घेतली. त्या वेळी आरोपींनी दुचाकीवरून पळ काढला. आरोपी २० ते २५ वयोगटातील असून, त्यांनी जिन पँट घातली होती. त्यांच्या तोंडाला रुमाल बांधलेला होता. अजय यांनी सुरक्षारक्षकाकडून फोन घेऊन बिष्णोई यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर काही वेळातच ते घटनास्थळी पोहोचले. त्यानंतर त्यांनी शुक्रवारी पोलिसांकडे तक्रार दिली आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजवरून आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.
नेमके काय झाले?
– अजय होगाडे रांका ज्वेलर्सचे दागिने घेऊन पुण्याला रवाना.
– दागिने, हिरे असलेली पाकिटे बॅगेत ठेवली होती.
– लोणावळा ओलांडल्यानंतर बिष्णोई यांना फोन केला.
– पुणे स्टेशनला पोहोचल्यानंतर प्लॅटफॉर्म क्रमांक सहावरून पाठीमागील रिक्षा स्टँडवर गेला.
– बिष्णोई यांना फोन करण्याचा प्रयत्न केला असता, पाठीमागून दोघांनी धक्का दिला.
– चौघांपैकी एकाने चाकूसारख्या हत्याराने अजयच्या पोटावर वार केला.
– त्यानंतर झालेल्या झटापटीत चोरट्यांनी पाठीवर वार करून बॅग हिसकावली.