शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या सेवासदन या सरकारी बंगल्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार आदी नेत्यांची मराठा आरक्षणाबाबत गुरुवारी रात्री चर्चा झाली. मराठा आरक्षणाबाबत सर्व पक्षांच्या नेत्यांची बैठक बोलवण्याचाही निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे. त्यानुसार शनिवारी सर्व पक्षीय नेत्यांची बैठक बोलवण्यात आली आहे. त्यात मुख्यतः मराठा आरक्षणाच्या विषयावर चर्चा होईल.
राज्यातील मराठा आरक्षणासाठी होणारे आंदोलन थांबवण्यात आले तर सरकार चर्चा करण्यास तयार आहे. आंदोलकांनी तुटेपर्यंत ताणू नये, असे माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी शुक्रवारी सांगितले. तोडफोड आणि जाळपोळीसारख्या हिंसक आंदोलनामुळे राज्याचेच नुकसान होईल, सरकार आरक्षण देण्यास सक्षम आहे, सरकारशी चर्चा केली पाहिजे, असे राणे यांनी सांगितले.