महागडय़ा मोबाइलची पाचशे रुपयांना विक्री

 रात्री किंवा पहाटे प्रवास करून बस किंवा रेल्वेतून बाहेर पडल्यास बहुतांश जण खिशातून मोबाइल काढून आपण पोहोचल्याची माहिती आप्तांना देत असतात. नेमका याच संधीचा फायदा घेऊन प्रवाशांकडील मोबाइल संच पळवून नेण्याचा गुन्हा करणाऱ्या दोघांना अ‍ॅन्टी गुंडा पथकाच्या दक्षिण विभागाने पकडले आहे. प्रवाशांचे हजारो रुपये किमतीचे महागडे मोबाइल हे चोरटे नशेसाठी केवळ पाचशे रुपयांना विकत असल्याचेही तपासात समोर आले आहे. त्यांच्याकडून आठ मोबाइल संच जप्त करण्यात आले.

रोहित राजू पवार (वय १९, रा. भवानी पेठ, गवळीवाडा) आणि राजू अनिल जाधव (वय २०, रा. एडी कॅम्प चौक) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांच्यावर बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरात पुणे रेल्वे स्थानक, स्वारगेट त्याचप्रमाणे शिवाजीनगर एसटी स्थानकाजवळील परिसरात रस्त्यावर नागरिकांना लुटण्याचे प्रकार वाढल्याने अ‍ॅन्टी गुंडा स्कॉडकडून याबाबत तपास करण्यात येत होता. प्रवाशांचे मोबाइल हिसकवणारी दोन मुले एका दुचाकीवरून पुणे रेल्वे स्थानकाच्या परिसरात येणार असल्याची माहिती बुधवारी रात्री पोलीस नाईक अजय उत्तेकर आणि शिपाई राकेश खुणवे यांना मिळाली होती. त्यानुसार पथकाने रेल्वे स्थानकासमोरील स्वामी समर्थ मंदिरासमोरील रस्त्यावर सापळा लावून दोघांना पकडले.

आरोपी पुणे स्टेशन आणि स्वारगेट परिसरात रात्री ११ ते पहाटे ५ या वेळेत सावज हेरत होते. गाडीतून उतरल्यानंतर काहीशा निर्जण रस्त्याने जाताना मोबाइलवर बोलणाऱ्या नागरिकांचा मोबाइल हिसकावून ते पळ काढत होते. त्यांच्याकडून आठ मोबाइल संच जप्त करण्यात आले असले, तरी त्यांनी आणखी गुन्हे केल्याची शक्यता आहे.

राजू पवार हा दुचाकी चालवायचा आणि रोहित पवार हा मोबाइल हिसकावून घेत होता. पवार याला दारूचेही व्यसन आहे. त्यामुळे त्याने चोरलेले मोबाइल अवघ्या पाचशे ते हजार रुपयांना विकल्याची बाबही समोर आली असल्याचे गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *