येरवडा कारागृहात कैद्यांमध्ये हाणामारी; एकाच्या डोक्यात घातला दगड

पुण्यातील येरवडा कारागृहात कैद्यांमध्ये पुन्हा एकदा हाणामारीचा प्रकार घडला आहे. चार कैद्यांमध्ये झालेल्या या भांडणात एकाच्या डोक्यात तिघांनी दगड घातल्याने तो गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर ससून रुग्णालयात उपचार सुरु आहेत. शनिवारी ही घटना घडली असून सोमवारी या प्रकरणी येरवडा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विकास मलगुंडे असे या घटनेत गंभीर जखमी झालेल्या कैद्याचे नाव आहे. येरवडा कारागृहातील बरॅक क्रमांक एकमध्ये शुभम राजापूर, सतपाल रुपनवर, विलास मलगुंडे आणि वेदांत माने या चौघा कैद्यांसह इतरही कैदी उपस्थित होते. शनिवारी रात्री ८.१० वाजण्याच्या सुमारास चौघांमध्ये अचानक भांडण झाले. यावेळी विकास मलगुंडे याला तिघांनी बेदम मारहाण करीत बरॅकमधीलच एक दगड विकासच्या डोक्यात घातला. यामुळे विकासच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली.

या घटनेची माहिती कारागृह प्रशासनाला मिळताच जखमी विकासला तत्काळ ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याची प्रकृती अद्यापही गंभीर असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. या चौघांमध्ये नेमक्या कोणत्या कारणावरून वाद झाला हे अद्यापपर्यँत समजू शकलेले नाही. मात्र, येरवडा कारागृहात कैद्यावर झालेल्या जीवघेण्या हल्ल्यामुळे कारागृहात एकच खळबळ उडाली आहे. यापूर्वी देखील कारागृहात कैद्यामध्ये भांडणाचे प्रकार घडले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *