चपाती संपल्याच्या वादातून भावाची हत्या

घरातील चपाती संपल्याने बाहेरून ब्रेड आणण्यावरून झालेल्या वादातून मोठ्या भावाने लहान भावाची हत्या केल्याची घटना माहीम येथे घडली आहे. इरफान फिरोज सय्यद (१८) असे मृत तरुणाचे नाव असून त्याच्या हत्येप्रकरणी भाऊ इम्रान (२४) याला माहीम पोलिसांनी अटक केली.

माहीम पोलिस ठाण्यानजीक किल्ला परिसरात सय्यद कुटुंब राहते. बुधवारी रात्री उशिरा इम्रान दारू पिऊन घरी आला. त्याला जेवायचे होते, पण जेवणात चपाती नसल्याने तो संतापला. त्याने लहान भाऊ इरफान याला उठवून ब्रेड आणायला सांगितले. पण इरफान याने नकार दिला. यावरून दोघांमध्ये जोरदार भांडण झाले. यावेळी झालेल्या हाणामारीत इम्रान याने इरफान याचा गळा दाबला. तोंडातून फेस आल्याचे पाहून घरच्यांनी इरफान याला रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले. याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल करून माहीम पोलिसांनी इम्रान याला अटक केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *