संपूर्ण देशाला हादरवून टाकणाऱ्या बुरारीमधील 11 आत्महत्यांचं गूढ आता हळूहळू उकलताना दिसतं आहे. बुरारीच्या संतनगरमध्ये एकाच घरात 11 मृतदेह आढळले होते. या आत्महत्या आहेत की हत्या, असा प्रश्न सर्वांनाच पडला होता. मात्र आता सीसीटीव्ही फुटेज हाती लागल्यामुळे या प्रकरणाचा तपास पूर्णत्वास जाण्याची शक्यता आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये कुटुंबातील सदस्यांनीच आत्महत्येसाठी वापरलेलं सामान घरात आणल्याचं स्पष्ट दिसतं आहे.
बुरारीतील भाटिया कुटुंबामधील 11 जणांचे मृतदेह आढळल्यानं खळबळ माजली होती. कोणीतरी व्यवस्थित नियोजन करुन संपूर्ण कुटुंबाला संपवलं असावं, अशी शक्यता भाटिया कुटुंबाच्या नातेवाईकांनी व्यक्त केली. मात्र सीसीटीव्ही फुटेजमध्ये भाटिया कुटुंबातील सदस्य टेबल आणि वायर दुकानातून आणताना दिसत आहेत. याच टेबल आणि वायरचा वापर करुन या कुटुंबानं स्वत:ला संपवलं, अशी माहिती पोलिसांनी दिली. भाटिया कुटुंबाच्या समोर राहणाऱ्या घराबाहेर सीसीटीव्ही कॅमेरा होता. यामध्ये भाटिया कुटुंबाची मोठी सून सविता आणि त्यांची मुलगी नीतू पाच टेबल आणताना दिसत आहे. याच टेबलांच्या आधारे संपूर्ण भाटिया कुटुंबानं गळफास लावून घेतला.
भाटिया कुटुंबाच्या समोर राहणाऱ्या एका घराबाहेर सीसीटीव्ही आहे. या सीसीटीव्ही 30 जूनला घडलेल्या घटना कैद झाल्या आहेत. यामध्ये भाटिया कुटुंबातील दोघी घरात टेबल घेऊन जाताना दिसत आहेत. भाटिया कुटुंबानं आधी घरात टेबल आणले. त्यानंतर रात्री 10 वाजून 20 मिनिटांनी समोरच्या दुकानातून वायर आणण्यात आल्या. ललित आणि भुवनेश भाटिया यांच्या मुलांनी समोरच्या दुकानातू वायर आणल्या. याच वायरचा वापर गळफास घेताना करण्यात आला.
विशेष म्हणजे भाटिया कुटुंबाशिवाय घरात कोणीही नव्हतं. त्यांच्या घरात कोणीही जबरदस्ती घुसत असल्याचं सीसीटीव्हीत आढळून आलेलं नाही. याशिवाय घरातील कोणत्याही व्यक्तीच्या शरीरावर जबरदस्ती झाल्याच्या खुणा नाहीत. त्यामुळे या कुटुंबानं सामूहिक आत्महत्या केली, हे स्पष्ट झालं आहे. पोलिसांना घरात सापडलेल्या रजिस्टरमध्ये मृत्यू हा मोक्षप्राप्तीचा मार्ग आहे, अशा संदर्भाचा मजकूर आहे. त्यामुळे मोक्षप्राप्तीसाठी या कुटुंबानं आत्महत्या केली असावी, अशी शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.