अभिनेता अक्षय कुमार यानं सोनाली बेंद्रेची रुग्णालयात जाऊन भेट घेतली आहे. सोनालीला कॅन्सरचं निदान झालं आहे. बुधवारी ( ४ जुलै) दुपारी ट्विट करत सोनालीनं कॅन्सर झाला असल्याची धक्कादायक माहिती चाहत्यांना दिली. सध्या सोनाली न्यूयॉर्कमधली एका रुग्णालयात उपचार घेत आहे. सोनालीला कॅन्सर झाल्याचे समजताच अक्षय कुमारनं तिची रुग्णालयात जाऊन भेटली. तसेच तिनं लवकर बरं व्हावं यासाठी प्रार्थना देखील केली. अक्षय सध्या आपल्या कुटुंबियांसोबत न्यूयॉर्कमध्ये सुट्ट्या व्यतीत करत आहेत.
अक्षय आणि सोनालीनं ‘तराजू’, ‘किमत’, ‘अंगारे’, ‘वन्स अपॉन अ टाइम दोबारा’ यांसारख्या चित्रपटातून काम केलं आहे. “सोनाली नक्की कॅन्सरवर मात करेन. या आजाराशी लढण्याकरता देव तिला शक्ती देवो’ अशी प्रतिक्रिया अक्षयनं दिली आहे. ‘कधी कधी तुम्हाला काही गोष्टींची कुणकुण लागते आणि अनपेक्षितपणे तुमच्या आयुष्यात बदल होतो. मला हाय- ग्रेड कॅन्सर असल्याचं निदान झालं आहे. सतत वेदना जाणवत असल्याने काही चाचण्या केल्या आणि त्यातून कॅन्सर झाल्याचं अनपेक्षितपणे निदान झालं. डॉक्टरांच्या सांगण्यानुसार मी त्यावर सध्या न्यूयॉर्कमध्ये उपचार घेत आहे. या मार्गातील प्रत्येक अडचणीला सामोरं जाण्यास मी सज्ज आहे. यात गेल्या काही दिवसांपासून लोकांकडून मला मिळत असलेल्या प्रेमाची फार मदत होत आहे. मी ही लढाई लढण्यास सज्ज आहे.’ अशी भावनिक पोस्ट लिहित तिनं कॅन्सर झाल्याची माहिती दिली होती. तिच्या ट्विटनंतर बॉलिवूडमधल्या अनेक कलाकारांनी सोनालीसाठी प्रार्थना केली आहे.