राजस्थानमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीने मुलीसोबत मिळून आपल्याच पतीची निर्घृणपणे हत्या केली आहे. वडिलांची हत्या करण्यासाठी मुलीने आपल्याच प्रियकराला हत्येची सुपारी दिली होती. या हत्येनंतर परिसरात खळबळ माजली आहे. पोलिसांनी याप्रकरणी चौघांना अटक केली आहे, यामध्ये मृताच्या पत्नीसोबत तिच्या दोन मुलींचा समावेश आहे.
४५ वर्षीय बाबूलाल आपल्या कुटुंबासोबत राहत होते. १८ जून रोजी चाकूने भोसकून त्यांची हत्या करण्यात आली. पत्नी सुंदरी देवी यांनी आपल्या दोन मुली आणि त्यांच्यातील एकीचा प्रियकर महिपाल यांच्या साथीने बाबूलाल यांच्यावर ३० वेळा चाकूने वार केले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिपालचं बाबूलाल यांच्या छोट्या मुलीसोबत प्रेमप्रकरण आहे. हत्येमध्ये महिपालचे काही मित्रही सामील असण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने तपास सुरु आहे. चौकशीदरम्यान आरोपींनी बाबूलाल चारित्र्यावरुन सतत संशय घेत असे अशी माहिती दिली आहे. यामुळेच त्यांना सतत मारहाणदेखील होत असे. यामुळेच घरात कलह वाढला होता.
यामुळेच सुंदरी देवी यांनी मुलीच्या प्रियकर महिपालला पतीच्या हत्येची सुपारी दिली. यासाठी त्यांनी तीन लाख रुपयेही दिले. हत्येनंतर आरोपी प्रचंड घाबरले होते, ज्यामुळे त्यांनी दरवाजातून पळ काढण्याऐवजी भिंतीवरुन उड्या मारल्या अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी चौघांना अटक करण्यात आली असून तपास सुरु आहे.