महिला आयोग अध्यक्षपदाच्या नियुक्तीवरुन दिल्लीतील आम आदमी पक्षाचे सरकार आणि दिल्लीचे नायब राज्यपाल नजीब जंग पुन्हा एकदा आमनेसामने आले आहेत.
राज्यपाल नजीब जंग यांनी मला महिला आयोगाच्या कार्यालयात न जाण्याचे आदेश दिल्याचा आरोप आप सरकारकडून नियुक्त करण्यात आलेल्या महिला आयोग अध्यक्ष स्वाती मलिवाल यांनी केला आहे.
तसेच कार्यालयाला टाळे ठोकले जाईल असेही जंग यांच्या कार्यालयातून सांगण्यात आल्याचे मलिवाल यांनी म्हटले आहे. त्यामुळे दिल्लीतील या वादाला नवे वळण मिळाले आहे.
नायब राज्यपालांनी मला फोन केला आणि गुरुवारपासून मी कार्यालयात जाऊ नये असे आदेश दिले. तसेच माझ्या फाईल्स परत मागवल्या. तसेच उद्या कार्यालयाला टाळे ठोकण्यात येई असे सांगितल्याचे मलिवाल यांनी ट्विटरद्वारे सांगितले.
आप सरकारने मलिवाल यांची आयोग अध्यक्षपदी नियुक्ती केल्यानंतर दोन दिवसांतच राज्यपालांनी त्यांची नियुक्ती रद्द ठरवली होती.

