मुंबईत विमान कोसळून ५ ठार

येथील घाटकोपर भागातील सर्वोदय रुग्णालयाजवळ चार्टर्ड विमान कोसळून झालेल्या अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला आहे, तर दोघे जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. विमान कोसळल्यानंतर झालेल्या स्फोटामुळं इथं मोठी आग लागली असून आसपासच्या परिसरात प्रचंड घबराट उडाली आहे.

आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. घाटकोपर पश्चिमेकडच्या एलबीएस मार्गावरील जीवदया लेन इथं एका इमारतीचं बांधकाम सुरू आहे. बांधकाम सुरू असलेला हा परिसर चारी बाजूंनी पत्रे लावून बंद करण्यात आला आहे. या कम्पाऊंडमध्येच हे विमान कोसळलं. विमान कोसळल्यानंतर मोठा स्फोट झाला. स्फोटाच्या आवाजामुळं आसपासच्या परिसरात घबराट उडाली. सुरुवातीला काय झालं हे कळलंच नाही. अपघातस्थळी धुराचे लोट दिसल्यानं आग लागल्याची चर्चा सुरू झाली. मात्र, नंतर महापालिकेच्या आपत्ती निवारण विभागानं विमानाचा अपघात झाल्याचं स्पष्ट केलं. यात विमानाच्या पायलटसह तीन तंत्रज्ञ व एका पादचाऱ्याचा जागीच मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच महापालिका, अग्निशमन दल व एनडीआरएफचे जवान घटनास्थळी पोहोचले असून मदत व बचावकार्य युद्धपातळीवर हाती घेण्यात आलं आहे.

अपघातग्रस्त विमान उत्तर प्रदेश सरकारचं आहे. मात्र, हे विमान सरकारनं विकलं होतं, असं सांगितलं जात आहे. याआधी अलाहाबाद इथं या विमानाला अपघात झाला होता. त्यानंतर हे विमान विकण्यात आलं होतं, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

अनर्थ टळला!

घाटकोपरमध्ये ज्या ठिकाणी चार्टर्ड विमान कोसळलं, तेथून काही अंतरावरच वर्सोवा-घाटकोपर मेट्रो मार्ग आहे. तसंच, आजूबाजूस मोठ्या प्रमाणावर रहिवासी वस्ती व जवळच सर्वोदय रुग्णालय आहे. पायलटनं प्रसंगावधान राखून हे विमान त्या निर्जन कम्पाऊंडमध्ये उतरवलं असावं, असं अंदाज आहे. त्याच्या प्रसंगावधानामुळं मोठा अनर्थ टळल्याचं बोललं जातंय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *