फांद्यांची पूजा नको, नवीन झाड लावा

वटपौर्णिमेला महिलांना घरबसल्या वडाच्या झाडांची पूजा करता यावी, यासाठी मध्यवर्ती पुण्यासह उपनगरातील बाजारात मंगळवारी वडाच्या फांद्या विक्रीसाठी उपलब्ध झाल्या. शहरात मोजक्याच राहिलेल्या वडाच्या झाडांना ओरबाडण्यापेक्षा वडाची नवीन झाडे लावण्यासाठी उद्यान विभागाने प्रोत्साहन द्यावे, अशी मागणी पर्यावरण अभ्यासकांनी केली आहे.

‘सात जन्म हाच पती लाभावा’ ही प्रार्थना करण्यासाठी वटपौणिर्मेला वडाची पूजा करण्याची प्रथा आहे. पूर्वी महिला सकाळीच घराजवळील वडाच्या पूजेसाठी एकत्र जमत होत्या. मात्र, गेल्या काही वर्षांत रस्ता रुंदीकरणासाठी मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाल्याने वडाची झाडे शहरातून नाहीशी झाली आहेत. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून वटपौर्णिमेच्या दोन दिवस आधीपासून वडाच्या फांद्या विक्रीसाठी दाखल होत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे वन विभाग आणि उद्यान विभागाने एकदाही या विक्रेत्यांवर कारवाई केलेली नसल्याने दरवर्षी विक्रीसाठीच्या फांद्यांची संख्या वाढतेच आहे.

वड हा शेकडो वर्षे जगणारा भारतीय वृक्ष असून, आयुर्वेदातही त्याला मोठे महत्त्व आहे. पुण्यात सिंहगड रस्ता, गणेशखिंड यांसह विविध महामार्गांवरही दुतर्फा वडाच्या झाडांच्या रांगा होत्या; पण रस्ता रुंदीकरणात ही झाडे तोडली असल्याने शहरात आता मोजकीच वडाची झाडे शिल्लक राहिली आहेत. त्यामुळे फांद्यांची पूजा करण्यापेक्षा महिलांनी वडाचे झाड शोधावे, अन्यथा शक्य असल्यास वडाचे एक तरी रोप प्लास्टिकच्या पिशव्यांत वाढवून निसर्ग संवर्धन संस्थांना द्यावे, असे आवाहन वनस्पतीतज्ज्ञ प्रा. श्री. द. महाजन यांनी केले.

परंपरेमागे ‘ऑक्सिजन’चे कारण

आपल्या प्रत्येक परंपरेमागे शास्त्र आहे. ते जपण्याबद्दल दुमत नाही; पण त्यासाठी वडाच्या फांद्या तोडून त्यांची पूजा करणे अयोग्य आहे. पूर्वी या सणांच्या निमित्ताने महिलांना घराबाहेर पडायला मिळत होते. आता परिस्थिती बदलली आहे. वडाला फेऱ्या मारण्यामुळे ऑक्सिजन मिळतो. वड हा वृक्ष पुरूषोत्तम आहे. केवळ मनुष्यप्राणी नव्हे, तर इतर वनचरांना आसरा, अन्न देण्याचे काम हा वृक्ष करतो. निसर्गात या झाडाला विशेष महत्त्व आहे. मात्र, शहरातून आपण या झाडाला हद्दपार केले आहे. शहराच्या विविध भागात वडाची झाडे लावली गेली पाहिजेत, असे मत बायोस्फिअर्सचे संस्थापक डॉ. सचिन पुणेकर यांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *