‘पॉन स्टार्स’ फेम रिचर्ड हॅरिसन यांचं निधन

सततच्या रटाळ मालिकांच्या लोकप्रियतेमध्ये टेलिव्हिजनवर प्रसारित होणारा एक कार्यक्रम प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत होता. तो कार्यक्रम म्हणजे ‘पॉन स्टार्स’. ‘हिस्टरी’ वाहिनीवर प्रसारित होणाऱ्या या कार्यक्रमात हॅरिसन कुटुंबातील तीन पिढ्या एकत्रच कौटुंबिक व्यवसायात कशा प्रकारे रुळल्या होत्या ते दाखवण्यात आलं होतं. अशा या कुटुंबातील सर्वात मोठी व्यक्ती म्हणजेच ‘द ओल्ड मॅन’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रिचर्ड हॅरिसन यांचं सोमवारी प्रदीर्घ आजाराने निधन झालं. ते ७७ वर्षांचे होते. त्यांचा मुलगा रिक हॅरिसन यांने याविषीयीची माहिती दिली.

‘पार्किन्सन डिसीस’ या आजाराने ते ग्रासलेले होते. रिकने इन्स्टाग्रामवर वडिलांचा एक फोटो पोस्ट करत त्यांच्या निधनाची माहिती दिली. ‘ते माझे हिरोच होते. वडिल म्हणून हा ओल्ड मॅन माझ्या आयुष्यात आला हे मी माझं भाग्यच समजतो’, असं त्याने इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिलं. ‘पॉन स्टार’ या कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्हाला जगभरातील अनेक प्रेक्षकांपर्यंत पोहोचता आलं. त्याशिवाय कुटुंबपद्धती, कुटुंबाप्रती असणारं प्रेम, आपुलकी आणि त्याला विनोदाची जोड असा हा सुरेख प्रवास होता. माझ्या वडिलांनी आयुष्याचा अगदी मनमुराद आनंद लुटला, असंही त्याने या पोस्टच्या माध्यमातून स्पष्ट केलं.

रिचर्ड हॅरिसन यांच्या निधनाचं वृत्त कळताच सोशल मीडियावरही अनेकांनी त्यांना श्रद्धांजली वाहण्यास सुरुवात केली. हिस्टरी वाहिनीतर्फेही सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *