मुलगी नको, अशी मानसिकता अनेकदा दिसून येते. मात्र, औरंगाबादमधील पैठण तालुक्यात मुलगा नको म्हणून एका आईने अकरा महिन्याच्या चिमुरड्याची पाण्याच्या टाकीत बुडवून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. वेदिका परमेश्वर एरंडे असे या निर्दयी मातेचे नाव असून पोलिसांनी तिला अटक केली आहे.
पैठण तालुक्यातील पैठणखेडा गावात राहणाऱ्या वेदिका परमेश्वर एरंडे या महिलेने रविवारी सकाळी बिडकीन पोलिसांकडे ११ महिन्यांचा मुलगा घरातून बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली. मुलाचे अपहरण झाल्याचा संशय वेदिकाने व्यक्त केला होता. पोलिसांनी या घटनेचा तपास देखील सुरु केला. मात्र, रविवारी संध्याकाळी वेदिकाच्या मुलाचा मृतदेह घराच्या आवारातील पाण्याच्या टाकीत आढळला. प्रेम एरंडे असे या मुलाचे नाव होते. यानंतर पोलिसांनी वेदिका आणि अन्य नातेवाईकांची चौकशी सुरु केली.
चौकशी दरम्यान वेदिकाकडून समाधानकारक उत्तर मिळत नव्हते. मात्र, पोलिसांनी कसून चौकशी करताच वेदिकाने मुलाच्या हत्येची कबुली दिली. वेदिकाला आधीपासूनच एक मुलगा असून दुसरे अपत्य मुलगी असावी, अशी तिची इच्छा होती. मात्र, मुलगाच झाल्याने वेदिका निराश झाली. यातूनच तिने मुलाची हत्या केली, अशी माहिती पोलिसांनी दिली.
