औषध समजून तणनाशक प्यायलेल्या मुलाचा मृत्यू

खोकल्याचे औषध समजून तणनाशक प्यायल्याने आरडेवाडी (ता. करवीर) येथील जयदीप कृष्णात पाचाकटे (वय १४) याचा मृत्यू झाला. बुधवारी सकाळी सातच्या सुमारास खोकल्याचा त्रास होऊ लागल्यामुळे जयदीपने घरात ठेवलेले खोकल्याचे औषध समजून नजरचुकीने तणनाशक प्राशन केले. काही वेळानंतर त्याला त्याचा त्रास होऊ लागल्याने त्याने घरच्यांना सांगितले. यावेळी जयदीपने घेतलेले औषध खोकल्याचे नव्हे तर तणनाशक असल्याचे घरच्यांच्या लक्षात येताच त्याला तत्काळ कोल्हापुरात सीपीआर रुग्णालयात दाखल केले.

औषधोपचार करूनही जयदीपच्या प्रकृतीत सुधारणा होत नसल्यामुळे पुढील उपचारासाठी त्याला खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. दोन दिवसांपासून तेथे त्याच्यावर उपचार सुरू होते. मात्र, तेथेही प्रकृतीत सुधारणा झाली नाही. अखेर शुक्रवारी रात्री एकच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. जयदीप श्री स्वयंभू हायस्कूल, बोलोली येथे आठवीच्या वर्गात शिकत होता. त्याच्या पश्चात आई, वडील, बहीण असा परिवार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *