बिग बॉसच्या घरात सध्या सुरू असलेल्या ‘द ग्रेट डिक्टेटर’ या टास्कमुळे चांगलीच खळबळ उडालीय. या टास्कचा भाग म्हणून नंदकिशोर हुकुमशाह बनला आहे तर, घरातील इतर सदस्य प्रजा आहे. परंतु, नंदकिशोर याची बेबंद हुकुमशाही मोडीत काढण्यासाठी आता घरचे सदस्य बंडाचा झेंडा हाती घेणार आहेत.
हुकुमशाह म्हणून प्रजेला मनाप्रमाणे आदेश देण्याचा अधिकार नंदकिशोरला देण्यात आला असून तो सदस्यांवर अन्याय करतो आहे अशी भावना व्यक्त केली जात आहे. हुकुमशाही लादली गेल्यावर ती मोडीत काढण्यासाठी बंड करणं गरजेचं असतं असं खुद्द बिग बॉसनंच सुचवल्यामुळे घरातील इतर सदस्यांना बळ मिळणार आहे. या बंडाच्या नेतृत्वाची धुरा मेघाच्या खांद्यावर देण्यात आली असून तिला हुकुमशाही संपुष्टात आणण्यासाठी काही टास्क दिले आहेत. हुकुमशाहाच्या पोस्टरवर काळं फासणे, हुकुमशाहाचा पुतळा नष्ट करणे, त्याच्यावर पाणी ओतणे अशा काही प्रतिकात्मक पद्धतीनं सदस्य हुकुमशाहाची सत्ता उलथून पाडू शकतात.
हुकुमशाहाचा अन्यायी राजवट संपुष्टात आणण्यासाठी प्रजेला सोबत घेऊन बंड यशस्वी करण्याची ग्वाही यावेळी मेघाने दिली. अन्यायाविरूद्ध वाचा फोडण्यासाठी मेघाच्या नेतृत्वाखाली पुकारण्यात येणारं हे बंड यशस्वी ठरेल की चिरडून टाकण्यात येईल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.