‘त्या’ATMमधील पाचपट पैशांचा आनंद क्षणिकच

सिडकोतील विजयनगर येथील अॅक्सिस बँकेच्या एटीएम मशिनमधून ग्राहकांना पाचपट रक्कम मिळत असल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी रात्री उशिरा घडला. या प्रकाराच्या मुळाशी पोहोचण्यात बँकेला यश आले असून, ज्या ज्या ग्राहकांना अधिक पैसे मिळाले ते वसूल करण्यासाठीची कार्यवाही सुरू केल्याची माहिती बँकेतील सूत्रांनी मंगळवारी दिली.

सिडकोतील विजयनगरमध्ये अॅक्सिस बँकेचे एटीएम मशिन आहे. सोमवारी दुपारी साडेचारच्या सुमारास या मशिनमध्ये रकमेचा भरणा करण्यात आला. परंतु, रात्री साडेनऊच्या सुमारास या एटीएमवर ग्राहकांची प्रचंड गर्दी झाली. पैसे काढताना जेवढी रक्कम टाकू त्याच्या पाचपट रक्कम मिळत असल्याचा अनुभव नागरिकांना येत होता. या परिसरात गस्तीवर असलेल्या पोलिसांचे गर्दीकडे लक्ष गेले. घडणारा प्रकार लक्षात येताच त्यांनी वरिष्ठ पोलिस निरीक्षक सोमनाथ तांबे यांना आणि बँकेच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली. काही सजग नागरिकांनीही बँकेला याबाबत कळविले. परंतु, तोपर्यंत ग्राहकांनी तब्बल दोन लाख ६८ हजार रुपयांची रक्कम काढल्याचे समजते. यानंतर येथे तत्काळ पोलिस कर्मचारी तसेच, बँकेचे अधिकारी दाखल झाले. गर्दीला हटवून हे एटीएम केंद्र बंद करण्यात आले.

एटीएममधील दोष दूर

हा प्रकार नेमका कशामुळे घडला याचा शोध घेऊन त्रूटी दूर करण्यात आल्याची माहिती बँकेतील सूत्रांनी दिली. मशिनच्या ज्या ट्रेमध्ये पाचशे रुपयांच्या नोटांचा भरणा करावयाचा हवा होता त्यामध्ये दोन हजार रुपयांच्या नोटांचा भरणा करण्यात आला. त्यामुळे हा प्रकार घडल्याचे अॅक्सिस बँकेतील विश्वसनीय सूत्रांचे म्हणणे आहे. बँकेच्या किंवा अन्य बँकांच्या कोणत्या ग्राहकांनी येथून या कालावधीत पैसे काढले याची माहिती संकलित केली जाते आहे. हे पैसे संबंधित ग्राहकांकडून रिकव्हर करण्याची कार्यवाही सुरू असल्याचेही सूत्रांकडून सांगण्यात आले.

आमच्या गस्तीवरील पोलिसांनी गर्दीबाबत विचारणा केली तेव्हा हा प्रकार उघडकीस आला. आमच्या कर्मचाऱ्यांनी त्याबाबत खातरजमा केली. बँकेने एटीएम कार्यप्रणालीमधील त्रूटी दूर केल्या आहेत. या एटीएम सेंटरवरून त्या विशिष्ट कालावधीत पैसे काढणाऱ्यांची माहिती बँकेला सहजगत्या उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे कुणाला अतिरिक्त पैसे मिळाले असतील तरी बँक ती वसूल करू शकेल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *