दीडशे कुटुंबे घेणार शीरखुर्माचा आस्वाद

दीडशेवर गरीब मुस्लिम कुटुंबियांचा रमजान ईदचा आनंदद्विगुणीत होणार आहे. त्यांना शीरखुर्म्याचाही आस्वाद घेता येणार आहे. जमाते इस्लामी हिंद संस्थेने यासाठी पुढाकार घेतला आहे.  शीरखुर्मा  या वैशिष्ट्यपूर्ण खाद्यपदार्थासाठी लागणारे काजू, बदाम, पिस्ते, शेवया, खोबरे, साखर, खजूर व अन्य साहित्याचे दीडशे कीट यंदा गरीब कुटुंबांपर्यंत पोचवले गेले आहेत. त्यामुळे या कुटुंबांची रमजान ईद अधिक उत्साहात साजरी होणार आहे.

मुस्लिम धर्मियांमध्ये रमजान ईदचे विशेष महत्व आहे. महिनाभर उपवास (रोजा) केल्यानंतर ईदच्या दिवशी आनंदोत्सव साजरा केला जातो. शीरखुर्मा आस्वाद घेण्यासाठी आप्तेष्ट, मित्र परिवाराला आवर्जून घरी बोलावले जाते. पण आर्थिक परिस्थिती बेताची असलेल्या कुटुंबांना रमजान ईदचा आनंदोत्सव साजरा करण्यास अडचणी येतात. शीरखर्मासाठी खर्च करण्याची ऐपत नसलेल्या अशा कुटुंबांमध्येही ईद आनंदाने साजरी होण्यासाठी जमाते इस्लामी हिंद संस्थेद्वारे दरवर्षी दानशुरांच्या मदतीने शीरखुर्मा खाद्यपदार्थाचे साहित्य दिले जाते. सुमारे साडेचारशे रुपये किमतीच्या या साहित्याचे दीडशेवर कीट यंदा नगरमध्ये दिले गेले आहेत. याशिवाय काही गरीब कुटुंबांना दैनंदिन गरजेच्या वस्तू व साहित्यही देण्यात आले आहे. गहू, तांदूळ, साखर, तेल, तूप, डाळी, मसाला, चहा पावडर व अन्य सुमारे १४०० रुपये किमतीच्या या राशन कीट साहित्याचे १६२ कुटुंबांना वाटप करण्यात आले आहे. यासाठीचा सुमारे सव्वा दोन लाखाचा खर्च दानशुरांच्या मदतीतून केला गेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *