बिहार: पतीसमोरच पत्नी आणि मुलीवर बलात्कार

एका लुटारुंच्या टोळक्यानं गावी जात असलेल्या व्यक्तीला झाडाला बांधून त्याच्यासमोरच पत्नी आणि १४ वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना बुधवारी संध्याकाळी बिहारमधील गया येथे घडली. तसंच त्यांच्याकडील रोकड आणि दागिनेही लुटून ते पसार झाले. याशिवाय याच टोळक्यानं काही दिवसांपूर्वी दोन दुचाकीस्वारांना लुटले होते.

गयामधील कोंच पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. पती, पत्नी आणि त्यांची १४ वर्षांची मुलगी दुचाकीवरून गावी निघाले होते. अंधार पडला होता. त्याचवेळी लुटारूंच्या एका टोळक्यानं त्यांची वाट अडवली. त्यांनी पतीला झाडाला बांधले. त्यांच्याकडील रोकड आणि दागिने लुटले. तसंच त्याच्या डोळ्यांदेखत पत्नी आणि मुलीवर सामूहिक बलात्कार केला, अशी माहिती पोलिसांनी दिली.

या घटनेची माहिती मिळताच गयाचे पोलीस उपअधीक्षक राजीव मिश्रा यांच्यासह पथक घटनास्थळी पोहोचले. त्यांनी २० जणांना संशयावरून ताब्यात घेतलं आहे. त्यातील दोघांना पीडितांनी ओळखलं आहे. अन्य संशयितांचा शोध घेण्यात येत आहे. पीडित महिलेला वैद्यकीय तपासणीसाठी गया येथील रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे, अशी माहितीही पोलिसांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *