मुंबई लोकल म्हटलं की त्यासोबत जागा पकडण्यावरुन होणारी रस्सीखेच, विंडो सीटसाठी होणारी भांडणं, चढता-उतरताना होणारे वाद, फोर्थ सीटवरुन हमरी-तुमरी हे आलंच. लेडीज डबा हा शाब्दिक वादांसाठी तसा प्रसिद्ध आहेच. मात्र अंबरनाथ लोकलमधील महिला प्रवाशांना चक्क फ्री-स्टाईल हाणामारी याचि देहि याचि डोळा अनुभवण्याची संधी मिळाली.
मध्य रेल्वेवरील अंबरनाथ लोकलमध्ये लेडीज डब्यातील महिलांमध्ये हाणामारी झाल्याची माहिती आहे. सीएसटीच्या दिशेने जाणाऱ्या ट्रेनमध्ये विठ्ठलवाडी आणि कल्याण स्थानकाच्या दरम्यान ही घटना घडली. भांडणाचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट असलं तरी बसण्याच्या जागेवरुन भांडण झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.
दरम्यान हाणामारी करणाऱ्या महिला प्रवाशांना डोंबिवली स्टेशनवर उतरवण्यात आलं असून त्यांच्यावर डोंबिवली जीआरपीमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

