उल्हासनगर येथील शांतीभवन महिला सुधारगृहात दोन वर्षापासून बंद असलेली महिला गरोदर झाल्याचा प्रकार उघडकीस आला होता. या प्रकरणी महिला बालकल्याण विभागाच्या मंत्री पंकजा मुंडे यांच्या आदेशाने सुधारगृहाच्या अधिक्षिका नंदा घोडेराव यांना निलंबित करण्यात आले आहे.
शांतीभवन या महिला सुधारगृहात दोन वर्षापासून २३ वर्षीय महिला पिटा कायद्यांतर्गत बंदी आहे. ही महिला २४ दिवसांची गरोदर असल्याने चर्चेचा विषय झाला आहे.
या प्रकरणात सुधारगृहाची अधिक्षिका नंदा घोडेराव, अन्य कर्मचारी आणि सुधारगृहातील महिला पोलीस कॉन्स्टेबल या संशयाच्या भोव-यात सापडलेल्या आहेत.
पुरुषाना या महिला सुधारगृहात प्रवेश नसतानाही ही महिला गरोदर कशी झाली, या प्रकरणाची चौकशी करणारे अधिकारी भरत पोखरकर यांचा चौकशी अहवाल. तसेच आमदार बालाजी किणीकर यांच्या तक्रार अर्जावर महिला व बालकल्याण मंत्री मुंडे यांनी दोन दिवसांपूर्वीच मंत्रालयात सुनावणी घेतली होती.
त्यानंतर नंदा घोडेराव यांना निलंबित करून गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यामुळे या सुधारगृहाचा तात्पुरता पदभार मेहेर यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
