नवी दिल्ली – राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याऐवजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणींच्या हस्ते मिळणार असल्याचे कळल्यानंतर 72 कलाकारांनी सोहळ्यावर बहिष्कार घातला. पुरस्कारांच्या 64 वर्षांच्या या प्रथेला यामुळे गालबोट लागले असून, अनेक कलाकारही नाराज झाले आहेत.
मात्र, ज्या विजेत्या कलाकारांनी पुरस्कार सोहळ्यावर बहिष्कार टाकला होता, त्यांचे पुरस्कार व प्रमाणपत्र त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचे नियोजन केंद्र सरकारकडून करण्यात आले आहे. राष्ट्रीय पुरस्कार व प्रमाणपत्र विजेत्या कलाकारांपर्यंत पोहोचवण्यासाठी केंद्र सरकारकडून स्पीड पोस्ट सुविधेची मदत घेण्यात येणार असल्याचे वृत्त समोर आले आहे.
विजेत्यांनी कितीही सन्मानापासून दूर राहण्याचा प्रयत्न केला तरीही त्यांचे पुरस्कार त्यांच्या घरापर्यंत पोहोचवण्याचे माहिती व प्रसारण मंत्रालयानं निश्चित केले आहे. 70 हून अधिक कलाकारांनी राष्ट्रीय पुरस्कार सोहळ्यावर बहिष्कार घातला. या पार्श्वभूमीवर विजेत्यांचे पुरस्कार त्यांच्यापर्यंत कसे पोहोचवावेत?, यावर विचारविनिमय करण्यात आला. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विचारविनिमय केल्यानंतर केंद्र सरकारनं ठरवले की दरवर्षीप्रमाणे यंदाही स्पीड पोस्ट सुविधेच्या मदतीनं राष्ट्रीय पुरस्कार विजेत्यांपर्यंत पोहोचवण्यात येणार आहेत. याबाबतची प्रक्रिया लवकरच सुरू करण्यात येणार असल्याचीही माहिती समोर आली आहे.
दरम्यान, प्रत्येक वर्षी तीन-चार विजेते देशात नसल्यानं किंवा प्रकृतीच्या कारणांमुळे पुरस्कार सोहळ्यात उपस्थिती दर्शवू शकत नाहीत. तेव्हा अशा परिस्थितीत सरकारकडून स्पीड पोस्टच्या सहाय्याने विजेत्यांपर्यंत पुरस्कार पोहोचवला जातो.
