ओडिशामध्ये एका ३० वर्षीय महिलेवर सहा जणांनी मिळून सामूहिक बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. पीडित महिला आपल्या पती आणि मुलीसोबत कारने प्रवास करत असताना चुकून रस्त्यावरच राहिली होती. जवळपास १७ किमी कार चालवल्यानंतर आपली पत्नी कारमध्ये नसल्याचं पतीच्या लक्षात आलं. रविवारी संध्याकाळी जगतसिंगपूर जिल्ह्यात महिला सापडली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
गुरुवारी संध्याकाळपासूनच महिला बेपत्ता होती. अंगूल पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिला आपल्या नातेवाईकाच्या घरी राहत होती. दरम्यान जगतसिंगपूर आणि अंगूल यांच्यात १५० किमी अंतर असून महिला मानसिक धक्क्यात असतानाही इतकं अंतर कसं काय पार केलं याची माहिती घेत आहोत असं पोलिसांनी सांगितलं आहे. ‘महिलेचा जबाब अद्याप नोंदवण्यात आला नसला तरी नेमकं काय झालं असेल हे आम्ही खात्रीलायक सांगू शकतो’, असं वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितलं आहे.
पोलिसांनी सांगितल्यानुसार, संबळपूरची रहिवासी असणारी पीडित महिला आपला पती आणि मुलीसोबत कारने कट्टकला चालली होती. यावेळी तिचा पती कार चालवत होता. तिची सहा वर्षांची मुलगी कारच्या पुढच्या सीटवर बसली होती. रात्री जवळपास १० वाजता नाकची गावाजवळ महिलेने प्राथमिक विधीसाठी कार थांबवण्यास सांगितलं. परत आल्यानंतर हात धुण्यासाठी तिने कारमधून पाण्याची बाटली घेतली आणि दरवाजा बंद केला. दरवाजाचा आवाज आल्याने पत्नी कारमध्ये बसलीये असं समजत पतीने कार सुरु केली.
जवळपास १७ किमी अंतर पार केल्यानंतर मुलीला चॉकलेट विकत घेण्यासाठी पतीने कार थांबवली. यावेळीही आपण आपल्या पत्नीला रस्त्यात सोडून आल्याचं त्याच्या लक्षात आलं नाही. ती काहीतरी विकत घेण्यासाठी खाली उतरली असावी असं त्याला वाटलं. पण बराच वेळ होऊनही पत्नी आली नसल्याने त्याने शोधाशोध सुरु केली. यानंतर त्याने १७ किमी मागे जिथे पत्नीशी शेवटचं बोलणं झालं होतं तिथे कार नेली. पत्नी सापडत असल्याने त्याने वारंवार त्या रस्त्यावर कार चालवत शोध घेण्याचा प्रयत्न केला. पत्नी सापडत नसल्याचं लक्षात आल्यानंतर त्याने पोलीस ठाण्यात तक्रार केली.
पोलिसांनी तपास सुरु केला होता, मात्र तीन दिवस त्यांच्या हाती काहीच लागलं नाही. महिलेच्या नातेवाईकांना पोलीस किंवा तिच्या पतीशी संपर्क का नाही केला हे पोलिसांना समजत नाहीये. दरम्यान एका व्यक्तीने महिला रस्त्यावर एकटी चालत असताना रिक्षातून जाणाऱ्या सहाजणांनी तिचं अपहरण केल्याचं आपण पाहिलं असल्याचं सांगितलं आहे. पोलिसांनी याप्रकरणी चौघांना ताब्यात घेतलं आहे.
