चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या

पत्नी वारंवार फोनवर बोलत असल्याने तिचे अनैतिक संबंध असल्याचा संशय घेऊन पतीने तिची निर्घृण हत्या केल्याची घटना तालुक्यात घडली. याप्रकरणी पोलिसांनी बारा तासांच्या आत आरोपीला अटक केली आहे. ठाणे ग्रामीणचे प्रभारी अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत कदम यांनी शहापूर येथे पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

मृत सुनीता संतोष शेळके (४०) ही बिरवाडी येथे राहात असून जवळच असलेल्या भगर कंपनीत कामाला जात होती. सुनीता वारंवार फोनवर बोलत असून आपल्याला बघून फोन बंद करते, असा संशय संतोषच्या मनात होता. या कारणास्तव तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन संतोषने तिला दुपारी गावाजवळच्या सिमेंटच्या पाइपाजवळ बोलवून तिच्याशी दोन वेळा शरीर संबंध ठेवले. त्यानंतर तिच्याच साडीने गळा आवळून तिची हत्या केली. त्यानंतर संतोषनेच रात्री पत्नी घरी आली नसल्याचा कांगावा केला होता.

याबाबत शहापूरचे उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल ठाकूर, पोलीस निरीक्षक महेश शेटय़े, साहाय्यक पोलीस निरीक्षक अर्चना दुसाने व अन्य सहकाऱ्यांनी रातोरात तपास करत पती संतोषला अटक केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *