मुलींच्या लग्नाची चिंता गोरगरिबांना, कष्टकरी- शेतकऱ्यांना भेडसावत असते. हे ओझे घेऊन कुणालाही आयुष्य संपवू लागू नये, यासाठी धर्मादाय आयुक्तालयाने सुरू केलेल्या उपक्रमातून एक हजार लग्नगाठी बांधण्यात आल्या आहेत. यातील सर्वाधिक विवाह ठाण्यातील ग्रामीण भागात झाले असून पुणे आणि अहमदनगरचा अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक लागतो. मुंबईतील अशा गरजू तीस जोडप्यांचे विवाह १२ मे रोजी होणार आहेत.
शेतकरी आत्महत्याग्रस्त भागातील आणि गरीब कुटुंबातील मुलींच्या लग्नाची जबाबदारी धर्मादाय निधीतून करण्यात आली आहे. धर्मादाय आयुक्तालयाने याबाबत पुढाकार घेतला असून, त्यासाठी जिल्हानिहाय समिती नेमण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. प्रत्येक धर्मादाय संस्थेला या समितीला निधी द्यावा लागेल, असेही त्यात स्पष्ट करण्यात आले आहे. धर्मादाय संस्थांमध्ये जमा झालेल्या निधीपैकी काही निधी सामुदायिक विवाहासाठी वापरण्यात येत आहे. धर्मादाय संस्थांनी पुढाकार घेऊन हा निधी दिला आहे. हे विवाह सामुदायिक रितीने व त्या त्या समाजाच्या पद्धतीप्रमाणे करण्यात येतात. या विवाहांमध्ये देवाणघेवाण वा कोणत्याही प्रकारच्या हुंडासदृश बाबींना स्थान नसल्याचे धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांनी स्पष्ट केले.
ठाण्यातील ग्रामीण भागामध्ये कष्टकरी आदिवासी समाज मोठ्या प्रमाणात आहे. ही योजना सुरू झाल्यानंतर त्यांच्याकडून अशा खोळंबलेल्या अनेक विवाहांच्या संदर्भात विचारणा सुरू झाली. महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त अधिनियमानुसार, सार्वजनिक हितासाठी निधीचा वापर करता येऊ शकतो. गरिबांचे सामुदायिक विवाह हादेखील धर्मादायचा उद्देश आहे. यात विवाहांमध्ये समाजनिहाय वर्गीकरण अद्याप करण्यात आलेले नाही. मात्र राज्याच्या ज्या भागांमध्ये या विवाहासाठी अधिक पुढाकार घेतला जातो, त्यांचे उदाहरण इतर ठिकाणी प्रबोधन शिबिरांमध्ये आवर्जून दिले जाते.
