नीरव मोदी लंडनमार्गे अमेरिकेत

फरार कर्जबुडव्या व हिरे व्यापारी नीरव मोदी हा अमेरिकेत सटकला असून तेथे त्याचा मुक्त संचार सुरू असल्याचे वृत्त हाती लागले आहे. मोदी हा हाँगकाँगहून ब्रिटनमार्गे अमेरिकेत गेला, असे समजते. अमेरिकेत जाण्यापूर्वी त्याने लंडनमध्ये एक महिना वास्तव्य केल्याचीही माहिती मिळाली आहे. टाइम्स ऑफ इंडियाच्या हाती लागलेल्या एका अधिकृत अहवालातून ही माहिती उघड झाली आहे.

पंजाब नॅशनल बँकेत तब्बल १३ हजार कोटी रुपयांचा कर्जघोटाळा करून नीरव मोदी व त्याचा साथीदार मेहुल चोक्सी यांनी भारतातून पलायन केले आहे. भारतातून पळ काढल्यानंतर तो हाँगकाँगमध्ये वास्तव्यास होता अशी माहिती केंद्र सरकारला मिळाली होती. त्यामुळे त्याला चौकशीसाठी भारताच्या स्वाधीन करावे, अशी मागणीही भारताने हाँगकाँगकडे केली होती. मात्र तो फेब्रुवारीमध्येच अमेरिकेत पसार झाल्याचे समजते.

नीरव हा एक जानेवारीला मुंबईहून यूएईमध्ये गेला. मात्र तेथे भारतीय अधिकाऱ्यांनी त्याचा पाठलाग केल्याने दोन फेब्रुवारीला तो हाँगकाँगला निसटला. हाँगकाँगमध्ये प्रदीर्घ काळ वास्तव्य करण्याची त्याची इच्छा होती. मात्र तेथील कठोर कायद्यामुळे तो तेथे फार काळ राहू शकला नाही. १४ फेब्रुवारीला त्याने हाँगकाँगहून लंडन गाठले. लंडनमधील एका महागड्या हॉटेलमध्ये तो साधारण महिनाभर राहिला. यानंतर त्याने अमेरिकेचा रस्ता धरला. हा सर्व प्रवास त्याने त्याच्या बेल्जियन पासपोर्टच्या आधारे केल्याचे समजते. भारताने त्याचा पासपोर्ट यापूर्वीच रद्द केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *