वाढत्या उष्म्यामुळे त्वचारोग, डोळ्यांच्या विकारामध्ये वाढ झाली असताना संसर्गजन्य तापाचाही जोर शहरात वाढला आहे. डोकेदुखी, अंगदुखी, डोळे लाल होणे, तापाचा जोर वाढत जाणे यासारखी लक्षणे या तापामध्ये दिसत आहे. हा तापवातावरणातील बदलामुळे असल्याचे निदान डॉक्टरांनी केले आहे.
हवेमध्ये विषाणूजन्य तापाला पूरक असणारे जंतू असतात. वाढत्या उष्म्यामुळे या विषाणूंची वाढ वेगाने होते. खासगी आणि सार्वजनिक रुग्णालयांमध्ये अशा प्रकारचा ताप असलेली रुग्णसंख्या वाढत असल्याचे निरीक्षण डॉक्टरांनी नोंदवले. मलेरिया, डेंग्यू सारख्या तापांमध्ये दिलेल्या औषधांचा कोर्स पूर्ण करायची पथ्ये रुग्ण पाळतात, मात्र संसर्गजन्य तापामध्ये ही औषधे पूर्ण घेतली जात नहीत. त्यामुळे ताप गेला तरीही ऋतूमानातील बदलामुळे ताप पुन्हा येण्याची शक्यता असते. रुगणांना यासंदर्भात वारंवार सांगूनही औषधांचा डोस पूर्ण केला जात नाही, अशी माहिती फिजिशिअन डॉ. विनय मोहिते यांनी दिली. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, महिलांना तापाची लागण लवकर होते, या घटकांत रोगप्रतिकारशक्ती कमी असल्यामुळे संसर्गजन्य तापाची लागण लवकर होताना दिसते. पावसाळ्यामध्ये स्वच्छ व शुद्ध पाण्याचा आग्रह धरला जातो. पाणी उकळून गार करून प्यायले जाते. या कालावधीमध्येही उकळून गार केलेलेच पाणी प्यायला हवे. रस्त्यावरील दूषित बर्फ असलेल्या थंडगार सरबतांमधून संसर्ग वाढतो. विषाणूजन्य अतिसारामध्ये पोटात दुखणे, जुलाब लागणे, उलट्या होण्याच्या तक्रारी अधिक असतात. पोटदुखीमुळेही अंगदुखी, ताप येण्याच्या तक्रारी वाढताना दिसत आहेत.