सावंतवाडीच्या कन्येचे अमेरिका विद्यापीठात सुयश

शिक्षणासाठी मिळणाऱ्या फेलोशिपच्या माध्यमातून सावंतवाडीची सुकन्या सौ. सुयश्री भोसले- चटोपाध्याय हिने अमेरिकेतील नामांकित विद्यापीठातून इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग विषयात डॉक्टरेट (पीएचडी) पदवी प्राप्त केली आहे. माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले यांची सुयश्री ही कन्या आहे. तिने शिक्षणासाठी मिळणाऱ्या फेलोशिपची योग्य निवड करून अमेरिकेत विविध संस्थांमार्फत मिळणाऱ्या फेलोशिपच्या आधारे पदवीपर्यंत शिक्षण घेतले, तिला डॉक्टरेट पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी पन्नास हजार डॉलर्सची फेलोशिप मिळाली. सुयश्री भोसले- चटोपध्याय हिने ब्रेन टय़ुमर (कॅन्सर) आजारावर करण्यात येणाऱ्या उपचारासंबंधीचा विषय निवडला होता.

सुयश्री भोसले हिने आपले शिक्षण सावंतवाडी, मुंबई येथून पूर्ण केले. मुंबईच्या रुईया कॉलेजमधून बारावीपर्यंत शिक्षण घेतले. त्यानंतर मुंबईच्या राजीव गांधी इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी संस्थेतून इलेक्ट्रॉनिक्स इंजिनीअरिंगची पदवी प्राप्त केली. या पदवीनंतर पुढील शिक्षणासाठी त्या अमेरिकेत गेल्या. सुयश्री हिने कॅलिफोर्निया विद्यापीठातून मास्टर ऑफ सायन्स (मेडिकल डिवाईस अ‍ॅण्ड डायग्नॉस्टिक इंजिनीअरिंग) ही पदवी प्राप्त केली. या पदवीच्या काळात तिने तेथे नोकरीही केली. तसेच तिला शिक्षणासाठी तेथील विविध संस्थांची फेलोशिप मिळाली. तसेच शिक्षणासाठी गुगलची ५० हजार डॉलर्सची फेलोशिप मिळाली. या फेलोशिपमधून तिने व्हर्जिनिया टेक युनिव्हर्सिटीतून इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगची डॉक्टरेट पदवी प्राप्त झाली. विद्यापीठाचे प्रा. डाव्हलोस जाझी यांचे मार्गदर्शन लाभले. माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, आई अनुराधा भोसले व पती अरुणभ चटोपाध्याय यांनी ही तिला प्रेरणा दिली. सध्या सुयश्री सिलिकॉन व्हॅलीतील एका नामांकित कंपनीची नोकरी सांभाळून संशोधनाचे काम करत आहे. उच्चशिक्षण घेण्यासाठी शिक्षणाचा पाया मजबूत असल्यास ग्रामीण भागातील हुशार होतकरू विद्यार्थ्यांना अमेरिकासारख्या देशात फेलोशिपच्या माध्यमातून संशोधनात्मक उच्च शिक्षण मिळू शकते असे एक उदाहरण विद्यार्थिनीसमोर सुयश्री भोसले चटोपाध्याय हिने घालून दिले आहे.

सुयश्री हिचे पती अरुणभ चटोपाध्याय यांनीदेखील कानपूर आयआयटीमधून मास्टर डिग्री एम. टेक् प्राप्त झाल्यावर अमेरिकेत जाऊन मॅकेनिकल इंजिनीअरिंग अभ्यासक्रमात डॉक्टरेट प्राप्त केली आहे. आई-वडील, श्रीदेव पाटेकर महाराज व गुरुजन वर्गाच्या कृपा आशीर्वादाने हे फलित असल्याचे मानते असे सुयश्री भोसले म्हणाली. विद्यार्थिनीनी आपण ग्रामीण भागातील असल्याचा न्यूनगंड बाजूला ठेवून उच्चशिक्षणाची तयारी दर्शविली आहे. शिक्षणासाठी अमेरिकासारखा देश फेलोशिप देतो. त्याचा फायदा घेतला पाहिजे असे ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *