राष्ट्रीय महामार्गाच्या टोलमध्ये ३१ मार्चच्या मध्यरात्रीपासून सहा टक्के दरवाढ झाली असली तरी जुन्या मुंबई पुणे हायवेवर या टोलवाढीचा परिणाम होणार नाही. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा टोलचा कालावधी आणि जुन्या मुंबई पुणे हायवेच्या टोलसंदर्भात महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने केलेल्या कराराच्या कालावधीत फरक असल्याने परिणाम संभवत नाही.
या हायवेसोबतच सातारा-कागल राष्ट्रीय महामार्गावरही टोलच्या दरात वाढ होणार नाही. हे दोन्ही मार्ग महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या अखत्यारित आहेत. टोल दरवाढीचा प्रभाव प्रामुख्याने दिल्ली आणि अन्य शहरांना जाणवेल.
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास मंडळ तसेच सार्वजनिक बांधकाम खात्याने मुंबई- महाराष्ट्रात टोलच्या संदर्भात विविध कंपन्यांशी करार केले आहेत. करार करताना टोल किती वर्षांनी आणि किती प्रमाणात वाढवणार हे त्या करारानुसार ठरलेले आहे. त्यानुसार टोलचे धोरण ठरत असते.
