तूर विक्रीसाठी हमीभाव केंद्रावर रांगेत उभ्या राहिलेल्या शेतकऱ्याचा मृत्यू झाला. सकाळी आठ ते रात्री सातपर्यंत तूर विक्रीसाठी ते उन्हात उभे होते. ऊन वाढल्याने तालुक्यातील करवंजी येथील शेतकरी रावसाहेब शिवराम हाके (वय ६५) यांना भोवळ आली. त्यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. ही घटना लोहारा येथील हमीभाव खरेदी केंद्रावर गुरुवारी रात्री साडेसातच्या सुमारास घडली. करवंजी शिवारात रावसाहेब हाके यांची तीन एकर शेती आहे. या शेतात पिकवलेली तूर घेऊन लोहारा येथील हमीभाव केंद्रावर गुरुवारी सकाळी आठ वाजता विक्रीसाठी आले होते. तूर विक्रीसाठी वेळ लागल्याने प्रतीक्षा करीत ते दिवसभर लोहारा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आडत दुकानाच्या आवारातच होते. रात्री साडेसातच्या सुमारास अचानक चक्कर येऊन ते खाली कोसळले. उष्माघाताने त्यांचा मृत्यू झाला असावा, असे वैद्यकीय अधिकाऱ्याने सांगितले.
बाजार समितीच्या आवारात सुरू करण्यात आलेल्या खरेदी केंद्रावर गरजू शेतकरी अनेकदा दिवसभर ताटकळत असतात. हमीभाव केंद्राच्या वतीने या ठिकाणी पिण्याच्या पाण्याची अथवा तात्पुरत्या निवाऱ्याची व्यवस्थादेखील उभारण्यात आलेली नाही. उन्हाचा तडाखा आणि दिवसभर उपाशीपोटी हमीभाव केंद्राच्या दारात ताटकळत बसलेले शेतकरी, असे चित्र सर्वत्र पाहावयास मिळत आहे.
