तलावपाळी परिसरात झाडांना रोषणाईचा ‘फास’

चैत्र नवरात्रोत्सवानिमित्त जांभळी नाका येथील तलावपाळी परिसर रोषणाईने उजळून जात असला तरी, यामुळे परिसरातील झाडांचा श्वास कोंडू लागला आहे. हा परिसर झगमगवण्यासाठी सर्व झाडांवर प्रकाशाच्या विद्युतमाळा सोडण्यात आल्या असून त्यामुळे झाडांचे आयुर्मान कमी होण्याची भीती पर्यावरणप्रेमी व्यक्त करत आहेत. पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेच्या एका बडय़ा नेत्याच्या पुढाकाराने होणाऱ्या या उत्सवात ‘हरित ठाणे’ संकल्पनेला असा फाटा देण्यात येत असताना पालिका प्रशासनानेही त्याकडे दुर्लक्ष केले आहे.

आनंद चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने शिवाजी मैदान येथे चैत्र नवरात्र उत्सव साजरा करण्यात येत आहे. रविवार पासून या नवरात्रोत्सवास सुरुवात झाली असून  संध्याकाळी मोठय़ा प्रमाणात नागरिक या उत्सवाला भेट देत असतात. उत्सवाच्या निमित्ताने आजूबाजूचा परिसर रोषणाईने उजळून गेला आहे. जागोजागी या परिसरात विद्युत प्रकाशमाळांचा वापर करून रोषणाई करण्यात आली आहे. मात्र हे करताना परिसरातील झाडांनाच ‘फास’ लावण्यात आल्याचे दिसून येत आहे. झाडांच्या खोडांना विद्युत माळांनी वेटोळे घालण्यात आले आहेत. तसेच  झाडांच्या फांद्यांवर या विद्युत प्रकाश माळा टाकण्यात आल्या आहेत. तलावाभोवती असणाऱ्या काही झाडांच्या फांद्या या तलावातील आतील दिशने झुकल्या आहेत. त्यामुळे सोसाटय़ाचा वारा आल्यावर या माळा हलू लागतात.  त्या तलावात पडल्यास विद्युतप्रवाह पाण्यात उतरण्याची भीती काही सुज्ञ नागरिकांनी व्यक्त केली आहे.

याआधीही असे प्रकार

असाच प्रकार ठाण्यातील उपवन परिसरातील उपवन आर्ट फेस्टिवल या महोत्सवाच्या वेळीही घडला होता. मानवनिर्मित विद्युत उपकरणे वापरून मोठय़ा प्रमाणावर निर्माण होणारा प्रकाश हा झाडांवर परावर्तीत करण्यात आला होता. या वेळी तलावाच्या काठावार विद्युत माळाही  पसरवण्यात आल्या होत्या. तेव्हाही महापालिकेने दुर्लक्ष केले होते.

झाडांच्या फांद्यांवर बांधलेल्या विद्युत प्रकाशमाळांमुळे त्या झाडांचे जैविक चक्र बिघडण्याची दाट शक्यता असते. झाडांना वाढीसाठी प्रकाशाची मोठय़ा प्रमाणावर गरज असते. परंतु तो प्रकाश कोणत्या प्रकारचा आहे हेही महत्त्वाचे आहे. मानवनिर्मित विजेच्या उपकरणांमधून निर्माण केला जाणारा प्रकाश  वृक्षाच्या अधिक जवळ आणि जास्त काळ संपर्कात आल्यास तो वृक्षाच्या सर्वागीण वाढीवर अपायकारक ठरण्याची शक्यता असते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *