इंडोनेशियातील माउंट राँग आणि गमालामा ज्वालामुखींचे उद्रेक झाल्याने त्याचा थेट परिणाम येथील विमानसेवेवर झाला आहे. या ज्वालामुखींची राख आणि इतर कचरा हवेत २ हजार मीटर उंचीपर्यंत विखुरल्याने विमानांच्या मार्गात अडथळा निर्माण झाला आहे.
या राखेने विमानांच्या जेट इंजिनात बिघाड होत असल्याने तातडीने इंडोनेशियातील ३ महत्वाची विमानतळे बंद करण्यात आल्याची माहिती वाहतूक मंत्रालयाचे प्रवक्ते ज्युलियस अॅड्राविडा बराटा यांनी दिली आहे.
बंद करण्यात आलेल्या या तीन विमानतळांमध्ये जुनादा आंतरराष्ट्रीय विमानतळासह अब्दुल रेहमान विमानतळ आणि सुलतान बाबुल्ला विमानतळाचा समावेश आहे. ज्वालामुखीची ही राख हवेतून खाली बसल्यानंतरच विमानसेवा चालू करण्यात येणार असून खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचे बराटा यांनी स्पष्ट केले आहे.

