स्वप्नातील स्वस्त घर खरेदी करण्याचा विचार करीत आहात तर ही योग्य वेळ आहे. हे आम्ही नाही सांगत तर JLL च्या एका रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे. या रिपोर्टनुसार २०१७ मध्ये देशातील ७ मोठ्या शहरांमध्ये सुमारे ४ लाख ४० हजार फ्लॅट अजूनही विक्री विना पडून आहेत. यात सर्वात प्रथम क्रमांक दिल्ली -एनसीआरचा लागतो. या ठिकाणी सुमारे दीड लाख फ्लॅट रिकामे पडून आहेत.
मुंबईत कुठे खरेदी कराल घर…
मायानगरी मुंबईत आपल्या स्वप्नातील घर खरेदी करणे खूप अवघड काम आहे. मुंबई कोट्यवधी लोकांना रोजगार देते पण घर खरेदी करणे जिकरीचे काम आहे. या ठिकाणी संपूर्ण वर्षभर रिअल इस्टेटमध्ये मागणी कायम राहते. पण गेल्या काही वर्षात आलेल्या मंदीमुळे मुंबईतील रिअल इस्टेट सेक्टरमध्ये मंदी आली आहे. मुंबईत बिल्डर्सने प्रोजेक्ट लॉन्च केले पणअजून डिलीव्हरी दिली नाही.
महाराष्ट्रात रेरा कायदा लागू करण्यात आला. त्यामुळे धोकेबाज बिल्डरच्या मुसक्या बांधण्यात आल्यात. मुंबईतील अनेक भागात बिल्डर्सचे न विकलेले फ्लॅट शिल्लक आहेत. मुंबईच्या पश्चिम उपनगरात अजूनही ८८, ६३३ घरे रिकामी पडली आहेत. यांचा रेट सुमारे ५४०० ते ५५०० रुपये प्रति स्क्वेअर फूट आहे. ठाण्यात न विकलेल्या घरांची संख्या २८, २९० आहे. या ठिकाणी घरांच्या किंमती प्रति स्क्वेअर फूट ९६००-९७०० प्रति स्क्वेअर फूट आहे. मध्य उपनगरात हाच रेट १३२००, ते १३४०० रुपये आहे, याठिकाणी ४०, ६३१ घरं रिकामी पडून आहेत.